महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ४ ऑगस्ट – कोरोना महामारी मुले शाळा बंद आहेत ,विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ग्रामीण भागातील शिक्षकांनी व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून झूम अॅपद्वारे शिक्षण देणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणार्या शेतमजूर, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी कुठलीही व्यवस्था अद्याप झालेली नाही. अनेक ठिकाणी मोबाईल, रेंज, संगणकांचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ‘व्यत्य’ आला असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे आणि त्याची तयारी वरिष्ठ पातळीवर आहे. वेबिनारच्या माध्यमातून शिक्षण विभाग शाळापूर्व तयारी करण्याविषयी मार्गदर्शन करत आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर तयारी सुरू केलेली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी, विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी जोपासायची, पालकांचे कसे प्रबोधन करायचे, अशा विविध बाजूंनी विचारविनिमय सध्या सुरू आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. दहावी ते बारावी वर्गापासून विद्यार्थ्यांची पुढील भविष्याची वाटचाल सुरू होते.
ग्रामीण भागात जास्तीत जास्त शेतमजूर व शेतकरी वर्गातील मुले-मुली आहेत. त्यांनीसुद्धा सावलीतली नोकरी धरावी, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे ग्रामीण भागातील काही विद्यार्थी शहरात शिक्षण घेतात. लॉकडाऊन झाले तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोबाईलसुद्धा समजत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. पालक घरी असतील त्यावेळीच त्यांचे शिक्षण सुरू असते. दिवसातून केवळ एक तासच सध्या तरी ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.