Raj Thackeray : रमेश वांजळेंचा शेवटचा कॉल मला; २० मिनिटात मृत्यूची बातमी, राज ठाकरेंनी सांगितली हळवी आठवण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ नोव्हेंबर ।। खडकवासला विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर दिवंगत नेते आणि माजी आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे रिंगणात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या प्रचारासाठी आले, यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. रमेश वांजळेंसोबतचा शेवटचा किस्साही राज यांनी सांगितला.

राज ठाकरे काय म्हणाले?
आज माझे मित्र सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी प्रचारला आलोय. मयुरेशला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा असं वाटलं की माझा पुतण्या राहुल ठाकरे आला आहे. असाच दिसतो, मग कळलं की मयुरेश आहे. शेवटी लक्षात आले की पुतण्याच आला आहे, अशी भावस्पर्शी गोष्ट राज ठाकरेंनी सांगितली.

२० मिनिटांनी कळलं, रमेश गेला…
रमेश शेवटी कोणाशी बोलला तर तो माझ्याशी बोलला होता, मला बोलला आणि सांगितलं की हॉस्पिटलला आलो आहे, एमआरआय काढायला आणि दहा मिनिटात फोन करतो, असं सांगितलं होतं. पण २० मिनिटांनी कळलं की रमेश गेला… मला पुढे काय बोलायचं ते समजलंच नाही.. अनेक जण मला सोडून गेले, पण आज रमेश असता तर माझ्यासोबत असता, असं राज ठाकरे म्हणाले.

मी अनेकदा सांगत होतो, की गळ्यातलं वजन काढ, माझ्यासमोर कधी घालत नव्हता. मयुरेश मला त्याची आठवण करुन देतो, आकारानेही तसाच आणि सोनं देखील घालतो, गोड आणि चांगला मुलगा आहे. आज तुम्ही मयुरेशला मतदान कराल तेव्हा मला तर करालच, पण रमेशला मतदान केल्यासारखं तुम्हाला वाटेल. मी मयुरेशसाठी सभा घेणारच होतो, असंही राज ठाकरे म्हणाले.

पुण्याचा सत्यानाश करून ठेवला आहे. आपला जाहीरनामा बाहेर येतोय, महाराष्ट्र राज्यातला आपला पहिला असा जाहीरनामा असेल, ज्यात राज्यातील प्रश्नांची उत्तर कशी सोडवायची, हे देखील आपण त्या जाहीरनाम्यात देतोय, असं राज यांनी सांगितलं.

शरद पवारांच्या बारामतीमध्ये जा, मग लक्षात येईल की किती उद्योग शरद पवारांनी बारामती मध्ये आणले. पवार साहेब जर तुम्ही बारामतीत उद्योगधंदे आणले, तर महाराष्ट्रात का आणू शकला नाहीत? मग आम्ही तुम्हाला का महाराष्ट्राचे नेते म्हणायचं? महाराष्ट्रात उद्योगधंदे आणले, रोजगार दिला तर तो महाराष्ट्राचा नेता, स्वतःच्या तालुक्यांमध्ये विकास करणारा तालुक्याचा नेता. जाणता राजा वगैरे नंतरची गोष्ट, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *