Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्था जलद मार्गावर ! RBI, महागाईबद्दल मूडीजने दर्शवला अनुकूल अंदाज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ नोव्हेंबर ।। भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल स्थिर गतीने सुरू असल्याने जगासाठी भारतीय अर्थव्यवस्था ही ‘स्वीट स्पॉट’ असल्याचे मूडीज् रेटिंग्जने शुक्रवारी म्हटले. असे असले तरी, देशात चलनवाढीचा धोका असून रिझर्व्ह बँकेकडून अधिक कडक पतधोरण राबवले जाण्याची शक्यताही मूडीजने वर्तवली.

देशात कृषी क्षेत्राचा विस्तार झाला आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्रही वाढले आहे. पिक मोठ्या प्रमाणावर येणार असल्यामुळे येत्या काळात किरकोळ महागाई दर खाली येण्याची शक्यता आहे. किरकोळ महागाई दर मागील १४ महिन्यांचा उच्चांक गाठत ६.२१ टक्के नोंदवला गेला आहे. हा महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या कमाल सहनशील मर्यादेपेक्षा अधिक आला आहे. खाद्यान्न आणि त्यातही भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे ही महागाई झाल्याचे स्पष्ट दिसते आहे. खाद्यान्नातील वाढत्या किंमतीचा दबाव यापुढेही अर्थव्यवस्थेवर राहील, असे निरीक्षण मूडीजने दिले आहे.

मूडीजने जागतिक स्थितीचाही आडावा घेतला आहे. पुढील आर्थिक वर्षाचा (२०२५-२६) अंदाज देताना मूडीजने स्थानिक पातळीवर वस्तूवापरात वाढ होईल असे म्हटले आहे. याला लोकांच्या वाढलेल्या क्रयशक्तीची जोड मिळेल. सध्या देशात सणासुदीचा काळ सुरू आहे. त्याला ग्रामीण भागातून वाढणाऱ्या मागणीची जोड मिळेल, असेही मूडीजने म्हटले आहे.

देशाच्या क्षमतांचा कमाल वापर, व्यवसायवाढीसाठी असलेले पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये अधिक खर्च करण्याची सरकारची तयारी यामुळे खासगी गुंतवणूक वाढण्याचीही शक्यता आहे.

विस्तारलेला जीडीपी
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीअखेर वास्तविक जीडीपी ६.७ टक्के नोंदवला गेला आहे. देशांतर्गत वस्तूंचा वाढलेला वापर, वाढलेली गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या वस्तूनिर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) यामुळे जीडीपीच्या टक्केवारीत वाढ दिसून आली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतही स्थिर आर्थिक विकास होईल, याचे हे संकेत असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *