महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ नोव्हेंबर ।। राष्ट्रपती राजवटी बद्दलचा हा भाजपचा डाव आहे. उद्या निकाल लागेल आणि मग 24-25 तारखेला येथे आमदार पोहोचतील. बैठका होतील. विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील. केंद्रीय गृह मंत्रालयात भाजपचा कारभार असल्यामुळे आणि राजभवनात त्यांची शाखा असल्याने ते आम्हाला अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. ते आज मुंबईत बोलत होते. यातच त्यांनी आता थेट मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहराच थेट सांगून टाकला आहे.
महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो. लाडक्या बहिणीची मतं तुम्ही विकत घेतली आहेत का हे उद्या कळेल. लोकशाहीमध्ये सांगण्याचे बोलण्याचे स्वतंत्र आहे. जेवढं गौतम अदानी यांना स्वतंत्र आहे,गुन्हे करून सुटण्याचं तितकं सर्वांचं आहे. प्रकाश आंबेडकर लोकशाही मानणारे नेते आहेत. त्यांचे 50 60 आमदार निवडून येत असतील तर नक्की त्यांचा आम्ही विचार करू. लोकसभेत आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला, विधानसभेतही केला, त्यांचं असं म्हणणं आहे. ज्यांची सत्ता येणार त्यांच्यासोबत राहणार, आमची सत्ता येत आहेत तर ते आमच्या सोबत राहणार, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेत येणार आहे. त्यातील गाडीत बसलेले आहेत ते सर्व ड्रायव्हर निष्णात ड्रायव्हर आहेत. जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर आहेत. त्यांना उत्तम वाहन चालवता येतं हा माझा अनुभव आहे. काही लोकांना ड्रायव्हिंग फॅशन असतं. जयंत पाटील हे उत्तम राज्य चालवू शकतात. उद्धव ठाकरे यांना देखील अनुभव नव्हता तरी देखील त्यांनी सरकार चालवलं.
उद्या दहा नंतर मी सांगणार कोण मुख्यमंत्री असणार ते. मी असं म्हणालो सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली. नाना पटोले काय म्हणतात त्याबद्दल माझी उलट तपासणी घेऊन टाका, असं म्हणत संजय राऊत यांनी आता मुख्यमंत्रीपदाबाबत संकेत दिले आहेत. संजय राऊतांच्या बोलण्यावरून आता जयंत पाटील मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जयंत पाटील आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृत सुटल्यावर महाविकास आघाडीच्या सर्व जणांनी काम करणे अपेक्षित होत. महाराष्ट्रात काही ठिकाणी असे प्रकार झाले. काही अपवाद आहेत. उद्या निकाल लागल्यावर एकत्र बसून चर्चा करू. का घडतंय हे तपासून पहावं लागेल. लोकं का संतापले आहेत, याबद्दल माहिती घ्यावी लागेल, असं राऊत सोलापूर घटनेवर म्हणाले आहेत.