महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ नोव्हेंबर ।। महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृतपणा असला पाहिजे ही शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली होती. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी या ठिकाणी आलो आहे. यशवंतराव चव्हाण यांची भाषणं, त्यांची दूरदृष्टी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समोर ठेवूनच आम्ही काम करतो आहोत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आज अजित पवार यांनी कऱ्हाड येथील प्रीती संगमावर होते तेव्हा त्यांना रोहित पवार भेटले. रोहित पवार त्यांच्या पाया पडले त्यावेळी अजित पवार “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं रोहित पवारांना म्हणाले. या वक्तव्याची चर्चा होते आहे.
मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही
मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेलं नाही. मला नेता निवडलं गेलं आहे. एकनाथ शिंदेंना नेता म्हणून निवडलं गेलं आहे. लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून वाढल्या आहेत. आम्ही एक चांगलं सरकार देऊ यात काहीही शंका नाही. आम्ही तिन्ही नेते मिळून निर्णय घेऊ असंही अजित पवार म्हणाले.
प्रीती संगमावर रोहित पवार अजित पवार भेट
रोहित पवार आणि अजित पवार यांची भेट प्रीतीसंगमावर झाली. त्यावेळी रोहित पवार हे अजित पवारांच्या पाया पडले. त्यावेळी शहाण्यात थोडक्यात निवडून आलास दर्शन घे काकाचं असं अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुढे अजित पवार म्हणाले, रोहित माझ्या पाया पडला. वडीलधाऱ्यांचा मान ठेवणं ही आपली संस्कृती आहे. आम्ही लवकर आलो असतो तर शरद पवार भेटले असते. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले असते. टायमिंग जुळलं नाही. आजचा दिवस यशवंत राव चव्हाण यांचं स्मरण करण्याचा आहे त्या निमित्ताने रोहित पवार या ठिकाणी आले होते असंही अजित पवार म्हणाले. रोहितला मी चांगलं काम कर असं म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.