D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “एखादा पक्ष किंवा व्यक्ती…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ नोव्हेंबर ।। महाराष्ट्रात जे काही घडलंय त्याला माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार असल्याचा दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊतांनी डी. वाय. चंद्रचूड यांच्याबाबत राग व्यक्त केला होता. दरम्यान, एएनआयला चंद्रचूड यांनी दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांच्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. आम्ही आमच्या कार्यालयीन वेळात एक मिनिटंही काम करत नाही, हे आम्हाला दाखवून द्या, असं आव्हानच त्यांनी दिलंय.

तो अधिकार फक्त सरन्यायाधीशांकडेच
पक्षांमध्ये फूट पडते, ते सरकार स्थापन करतात, पण त्यावरील सुनावण्या लांबल्या जातात, असा दावा केला जातोय, यावर एएनआयच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रचूड म्हणाले, “माझं उत्तर अत्यंत साधं आहे की आम्ही एक मिनिटासाठीही काम केलं नाही हे तुम्ही दाखवून द्या. या वर्षभरात ९ सदस्यी खंडपीठ, सात सदस्यीय खंडपीठ आदी महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर आम्ही निर्णय दिले. त्यामुळे एखादा पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? सॉरी. हा अधिकार फक्त सरन्यायाधीशांकडे असतो.”

यावेळी मुलाखतकाराने संजय राऊतांनी केलेल्या टीकेचाही उल्लेख केला. त्यावर चंद्रचूड म्हणाले, “हीच समस्या आहे. काही राजकारण्यांना वाटतं की आम्ही त्यांचा अजेंडा पाळला तरच आम्ही स्वतंत्र आहोत. (किंवा सरन्यायाधीश निरपेक्ष आहेत.) आम्ही निवडणूक रोखेवर निर्णय घेतला. तो कमी महत्त्वाचा होता का? अलिगढ मुस्लीम विद्यापीठ प्रकरणात निर्णय घेतला. आम्ही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले. कलम ६ ए च्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी केली, हे कमी महत्त्वाचे होते का? माझ्या कार्याकाळात घटनापीठाने ३८ महत्त्वाच्या प्रकरणांवर निर्णय घेतले.”

“चांगले वकिल, पैसा आणि पद आहे म्हणून आम्ही त्यांची सुनावणी करावी असंही काही लोकांना वाटतं. पण आम्ही असं प्राधान्य देऊ शकत नाही”, यावरही चंद्रचूड यांनी जोर दिला.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
धनंजय चंद्रचूड हे उत्तम प्रोफेसर किंवा बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत. मात्र सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला असता तर महाराष्ट्रातलं चित्र बदललं असतं. आज जे चित्र दिसतंय ते नक्कीच दिसलं नसतं. चंद्रचूड यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले आहेत. आत्ताही कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकेल, आमदार विकत घेऊ शकेल. कारण दहाव्या सूचीची भीतीच राहिली नाही. न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली. जी काही दुर्घटना महाराष्ट्रात झाली त्याला जस्टिस चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *