मुंबई–अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांना तीन दिवस बंदी

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १२ डिसेंबर २०२५ | पालघर – ठाणे–घोडबंदर मार्गावरील दुरुस्तीमुळे पुन्हा एकदा वाहतुकीवर मोठा ताण येऊ नये, यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई–अहमदाबाद महामार्गावर नवी मुंबई दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना 12 ते 14 डिसेंबरदरम्यान ठराविक वेळेत बंदी घालण्यात आली आहे.

ऑक्टोबरमधील कोंडी टाळण्यासाठी उपाय
ऑक्टोबर महिन्यात ठाणे–घोडबंदर रस्त्यावरील कामामुळे सलग पाच दिवस महामार्गावर भीषण कोंडी झाली होती. काही वेळा 14 ते 15 तासांपर्यंत वाहने अडकली होती. शालेय बस आणि खुद्द पालकमंत्रीदेखील या कोंडीत सापडले होते.

याच पार्श्वभूमीवर यावेळी वाहतूक कोंडीची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून वाहतूक विभाग व महामार्ग प्राधिकरणाने आगाऊ नियोजन केले आहे.

मर्यादित वेळेत अवजड वाहनांवर बंदी
ठाणे–घोडबंदर मार्गाचे काम सुरू असल्याने गुजरातकडून मुंबई, ठाणे, घोडबंदर आणि नवी मुंबईकडे येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी 8 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत प्रवास करण्यास बंदी राहणार आहे.

अवजड वाहने वर्सोवा फ्लायओव्हरकडील मार्गावरून वळवण्यात येणार असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनधारकांसाठी सुविधा उपलब्ध
बंदीच्या वेळेत ढाबे, पेट्रोल पंप आणि सुरक्षित जागांवर वाहनं पार्क करण्याची परवानगी आहे. महामार्गावरून रोज मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, पालघर, वसई–विरार, मिरा–भाईंदर तसेच गुजरातकडे हजारो वाहनांची ये-जा होते. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय अत्यावश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *