![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १२ डिसेंबर २०२५ | पंढरपूर – नाताळ, एकादशी आणि वर्षअखेरच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरात भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. श्री विठ्ठलाची पाद्यपूजा सेवा 21 डिसेंबर ते 31 डिसेंबरदरम्यान तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
गर्दी टाळण्यासाठी निर्णय
डिसेंबर महिन्यात नाताळ, महिन्याची एकादशी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला भेट देतात. या काळात दर्शनाची प्रतीक्षा वाढू नये आणि भाविकांना जलद व सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भातील माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
पाद्यपूजेमुळे होत होता विलंब
पाद्यपूजा ही मंदिरातील विशेष सेवा असून, पाच भाविकांच्या गटासाठी 5,000 रुपयांच्या देणगीतून ही सेवा केली जाते. मागील काही दिवसांत पाद्यपूजेसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी होत असल्याने मुख्य दर्शन रांगेत विलंब निर्माण होत होता. गर्दी नियंत्रणात ठेवण्यातही अडचणी येत होत्या.
यामुळे भाविकांना मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने पाद्यपूजा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र मंदिरातील नित्य राजोपचार पूर्ववत सुरू राहणार आहेत.
