महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ नोव्हेंबर ।। राज्यात थंडीची लाट आली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातून आर्द्रता आणखी कमी होणार असून त्यात पुढील २४ तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे.
मुंबईचे किमान तापमान बुधवारी १७ अंश नोंदविण्यात आले आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे तापमान १० अंशाच्या आसपास आहे, त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला पुढील २४ तासांसाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने राज्यात पुढील दोन तीन दिवस थंडीचा जोर कायम असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा थंडीचे वातावरण लवकर तयार झाले आहे. यामुळे पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील गारवा वाढला असून त्यामुळे गुलाबी थंडी जाणू लागले असून तापमान ही खाली गेले आहे. थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. नंदुरबार शहरात उबदार कपडे विक्रीसाठी दुकाने सजली असून यावर्षी उबदार कपड्यांच्या किमतींमध्ये 15% पेक्षा अधिक वाढ झाल्याने महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात थंडीपासून बचावासाठी शेकोट्याचा आधार घेतला जात आहे. येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्ह्यात अजूनही तापमानात घट येण्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गुलाबी थंडी जाणू लागल्याने सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी निघणाऱ्या नागरिकांच्या प्रमाणही वाढले आहे.
मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये व पुण्यात गेल्या काही वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद बुधवारी झाली आली. हवेत गारवा वाढला असून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, लोणावळा, शिरुर, भागात तापमान 10 अंशांवर आले होते. पुण्याच्या भोरमध्ये तापमानात घट झाल्याने शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या गेल्या आहेत. बोचऱ्या थंडीत धुक्याच्या वातावरणात उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवत आहे. तापमानात चांगलीच घट झाल्याने नागरिक गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे.
कुठे किती थंडी आहे जाणून घ्या?
अहिल्यानगर – ९.४
नाशिक – १०.६
परभणी – ११.६
जळगाव – ११.७
नागपूर – ११.७
महाबळेश्वर – ११.८
सातारा – १२
छत्रपती संभाजीनगर – १२.२
अकोला – १३.६
सांगली – १४.४
सोलापूर – १५.२
कोल्हापूर – १५.५
अलिबाग – १५.८
मुंबई – १७.६
रत्नागिरी – २०.५
पालघर – २२.४