महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१ डिसेंबर ।। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर राज्यात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVM) वर शंका उपस्थित केली जात आहे. या संदर्भात तब्बल २३ उमेदवारांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले, ज्यामुळे दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. तसेच, महायुतीने एकूण २३२ जागांवर विजय मिळवत एकतर्फी यश मिळवले.
आश्चर्यकारक निकाल आणि मतदान टक्केवारीवर संशय
निवडणूक निकालांदरम्यान अनेक ठिकाणी समान निकाल दिसून आले. विशेष म्हणजे, संध्याकाळी सहा वाजल्यानंतर अचानक मतदानाची टक्केवारी वाढल्याचे नोंदले गेले, ज्यामुळे विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केले. यामुळे मतमोजणी प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले. निवडणूक आयोगाने या विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षांना बोलावले असले तरी, २५ उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे आयोगाच्या अडचणी वाढल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी
अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि दिग्गज नेते आहेत. यामध्ये बारामतीचे शरद पवार गटाचे युगेंद्र पवार, संगमनेरचे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोनमेंटचे रमेश बागवे, कर्जत-जामखेडचे भाजपचे राम शिंदे यांचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या नावांमध्ये नगर शहरातील अभिषेक कळमकर, पारनेरच्या राणी लंके, राहुरीचे प्राजक्त तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, हडपसरचे प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार आणि ठाणे शहराचे राजन विचारे यांचा समावेश आहे. या उमेदवारांनी निकालावरील शंका व्यक्त करत निवडणूक आयोगाकडे पडताळणीची मागणी केली आहे.
बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे, “सर्व प्रक्रियेत पारदर्शकता न राहिल्यामुळे मतमोजणी संशयास्पद ठरली आहे. माझ्यासह अनेक उमेदवारांच्या मते पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे,” असे युगेंद्र पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
निवडणूक आयोगाने या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी वेळ दिली असली तरी, पुन्हा मतमोजणी करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. जर मतमोजणी प्रक्रिया पुन्हा राबवली गेली, तर हा महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.
EVM वाद: पुढील दिशा काय?
EVM वर विश्वासार्हता टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाला ठोस पावले उचलावी लागतील. पुन्हा मतमोजणी केली गेल्यास निकालांवर मोठा परिणाम होऊ शकतो. तसेच, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा निर्माण करणे हे आयोगासाठी महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.
उमेदवारांनी उचललेल्या या मुद्द्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण अजून चिघळण्याची शक्यता आहे. EVM वादावर लवकर तोडगा न निघाल्यास विरोधी पक्षांचा रोष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. आता सर्वांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या पुढील कृतीवर केंद्रित झाल्या आहेत.
EVM वादावर शंका घेणाऱ्या उमेदवारांची यादी
युगेंद्र पवार – बारामती (शरद पवार गट)
बाळासाहेब थोरात – संगमनेर (काँग्रेस)
रमेश बागवे – पुणे कॅन्टोनमेंट
राम शिंदे – कर्जत-जामखेड (भाजप)
अभिषेक कळमकर – नगर शहर
राणी लंके – पारनेर (राष्ट्रवादी शरद पवार गट)
प्राजक्त तनपुरे – राहुरी (राष्ट्रवादी शरद पवार गट)
संदीप वरपे – कोपरगाव
सुनील भुसारा – विक्रमगड
प्रशांत जगताप – हडपसर
अशोक पवार – शिरूर
सचिन दोडके – खडकवासला
राहुल कलाटे – चिंचवड
चरण वाघमारे – तुमसर (पवार गट)
फवाद अहमद – अणुशक्तीनगर
केदार दिघे – कोपरी-पाचपाखाडी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
राजन विचारे – ठाणे शहर
नरेश मणेरा – ओवळा-माजिवडा
दीपेश म्हात्रे – डोंबिवली
एम. के. मडवी – ऐरोली
हितेंद्र ठाकूर – वसई (बविआ)
क्षितीज ठाकूर – नालासोपारा
राजेश पाटील – बोईसर