![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.१ डिसेंबर ।। राज्यात विधानसभा निवडणुकाचे निकाल नुकतेच लागले आहेत. सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत, मात्र दुसरीकडे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे, कारण एसटी महामंडळ तिकीटदरात मोठी वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. साम टिव्हीच्या सूत्रांनुसार तिकिटदरात 14 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसटीच्या दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे. मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही असे सांगत एसटी महामंडळाकडून दरवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. यात महामंडळाने 14.13 टक्के दरवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
सरकारने एसटी महामंडळाचा 14 टक्के तिकिटदरवाढीचा प्रस्ताव स्वीकारल्यास 100 रुपयांच्या तिकिटामागे 15 जास्तीचे मोजावे लागतील. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. याआधी 27 नोव्हेंबर 2021 रोजी तिकीटदरवाढ झाली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाला प्रति दिवस 15 कोटींच्या आसपास तोटा होतो. त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचे सांगितले जात आहे.
एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवला असला तरी नवीन सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
