महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – ता. ६ ऑगस्ट – शहर परिसरात बुधवारी दिवसभरात कधी जोरदार तर कधी तुरळक स्वरुपात श्रावण सरी बरसल्या. यामुळे सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले. मात्र, मुळशी व मावळ तालुक्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांना पूर आला आहे. तिन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाच्या शक्यतेने महापालिकेने शहरातील नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरात पावसाला सुरवात झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच हलक्या सरींना सुरवात झाली. दुपारी काही भागात जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गाच्या सेवा रस्त्यासह शहराच्या सखल भागातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले होते. काही ठिकाणी सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या खोदकामांमुळे चिखलही निर्माण झाला होता. पवना नदीकाठच्या पिंपरीतील सुभाषनगर, आंबेडकरनगर, संजय गांधीनगर, चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिर परिसरापर्यंत पुराचे पाणी आले होते.
दरम्यान, हवामान विभागाने गुरुवारपर्यंत (ता. 6) पुणे परिसरात अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापान व अग्निशामक विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी काठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची व्यवस्था केलेली आहे. नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले आहे.
महापालिकेचे आवाहन
@ शहर परिसरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी घरीच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
@ पाणी साचलेल्या भागातील कोणत्याही विद्युत खांबाला, ट्रान्सफॉर्मर, डीपी बॉक्स, इलेक्ट्रिकल्स बोर्ड यांना स्पर्ध करू नये. अशा ठिकाणी जाणे टाळावे.
@ शहरातील पादचारी भुयारी मार्ग (सब-वे) तसेच, पाणी साचलेल्या भागातून वाहनांसह किंवा पायी प्रवास करणे टाळावे.