महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ डिसेंबर ।। लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो आता युरोपमधील फुटबॉल क्लबकडून खेळत नसले तरीही ते आपल्या सहकारी खेळाडूंमध्ये लोकप्रिय आहेत. वर्ल्ड इलेव्हनसाठी नामांकित 26 खेळाडूंच्या यादीत 37 वर्षीय मेस्सी आणि 39 वर्षीय रोनाल्डो यांचाही समावेश आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू सध्या युरोपातील कोणत्याही क्लबकडून खेळत नाहीत. या 26 खेळाडूंची निवड 70 देशांतील 28 हजार खेळाडूंच्या मतांनी करण्यात आली आहे. अन्य 24 नामांकित खेळाडू गतवर्षी इंग्लंड, जर्मनी, स्पेन आणि फ्रान्समधील क्लबमधून खेळले होते.
इटलीमध्ये खेळणारा एकही खेळाडू या यादीत समाविष्ट नाही. आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही यामध्ये स्थान मिळालेले नाही. मेस्सी अमेरिकेचा क्लब इंटर मियामीकडून मेजर लीग सॉकरमध्ये तर रोनाल्डो सौदी अरेबियातील क्लब अल नासरसाठी खेळत आहे. हे दोन्ही दिग्गज फुटबॉलपटू अंतिम संघात स्थान मिळवतात की नाही हे 9 डिसेंबरला समजेल.