महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर ।। नागपूर : हेल्मेट घालून प्रवास करणे, हे वाहनधारकांच्या हिताचेच आहे. मात्र विविध आजारांनी ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी हे खूपच त्रासदायक आहे. ज्येष्ठांनी गाडीवर बसल्यानंतर हेल्मेट सांभाळायचे की स्वतःला, याचा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असा सवाल करीत, शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी दुहेरी ‘हेल्मेटसक्ती’ला तीव्र विरोध केला.
वाहतूक पोलिसांनी दुचाकीचालकाच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेटची सक्ती केली आहे. या विरोधात सध्या शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून विरोध केला जात आहे. ”सकाळ”ने यासंदर्भात आतापर्यंत शहरातील विविध वयोगटांतील वाहनधारकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. याच मालिकेत ज्येष्ठ नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या असता, त्यांनीही या निर्णयाला कडाडून विरोध केला.
दोघांना हेल्मेटसक्तीला माझा व्यक्तीशः तीव्र विरोध आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार असतात. अशा परिस्थितीत हेल्मेट घालून प्रवास केल्यास मानेला वेदना व त्रास होऊ शकतो. शिवाय पती किंवा मुलांसोबत बाहेर गेल्यानंतर हेल्मेट कुठे ठेवायचे, हाही मोठा प्रश्न आहे. तसे ते चोरी जाण्याचीही भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी हेल्मेटसक्ती करण्याऐवजी रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करण्याची आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची खरी गरज आहे.
-प्रमिला राऊत, दिवाण ले-आऊट, बेसा रोड
माझ्या मते, ज्येष्ठ महिलांना हेल्मेटसक्ती नकोच. त्यांच्या अनेक अडचणी आहेत. एकवेळ पुरुषांना हेल्मेटसक्ती मी समजू शकते. परंतु महिलांना हेल्मेट, पिशवी, पर्स व भारतीय परिधान वस्त्रे सांभाळताना होणारा प्रचंड त्रास लक्षात घेता, मागे बसणाऱ्या महिलेला हेल्मेटची सक्ती करणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. आम्हा महिलांच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी माझी मागणी आहे.
-सुरेखा रेवतकर,उल्हासनगर, मानेवाडा चौक
दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांनाही हेल्मेटची सक्ती करणे खरोखरच डोकेदुखी ठरणार आहे. विशेषतः माझ्यासारख्या ७० वर्षांच्या महिलेला हेल्मेटचा फारच त्रास होणार आहे. कारण हेल्मेट घालून गाडीवर व्यवस्थित बसताना अडचण जाऊ शकते. त्यामुळे संतुलन राखणे कठीण जाणार आहे. या अडचणी बघता शासनाचा हा निर्णय अजिबात व्यावहारिक वाटत नाही.
– गीता महाकाळकर, पार्वतीनगर, रामेश्वरी