महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर ।। पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी टोईंग कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे. त्यामुळे नो पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करणे वाहनचालकांना आता चांगलेच महागात पडणार आहे. नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यास, जीएसटीसह वाहनावरील यापूर्वीचा थकीत दंडही वसूल केला जाणार आहे.
शहरातील मध्यवर्ती व वर्दळीच्या मार्गांवर ही कारवाई केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. अनेकजण अस्ताव्यस्त, बेकायदेशीरपणे दिसेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी वाहतूक पोलिस आता टोईंग वाहनांचा आधार घेणार आहेत.
नो पार्किंगमध्ये पार्क केलेली वाहने जवळच्या वाहतूक शाखेत जमा केली जातील. तिथून नागरिकांना आपली वाहने सोडवून घेता येतील. शहरात एकूण 25 वाहनांद्वारे कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ वाहने कार्यान्वित झाली आहेत.
दुचाकी वाहनांसाठी 500 रुपये दंड, 200 रुपये टोईंग चार्ज, 36 रुपये जीएसटी असा 736 रुपये दंड आकारला जात आहे. तर चारचाकी वाहनांसाठी 500 रुपये दंड 400 रुपये टोईंग चार्ज आणि 72 रुपये जीएसटी असा 972 रुपये दंड आकारला जात आहे. टोईंग केलेल्या वाहनावर पूर्वीचे चलन आहे का, याची वाहतूक पोलिस तपासणी करतील. प्रलंबित चलनांपैकी एक आणि आताच्या कारवाईचे चलन किमान भरणे बंधनकारक असणार आहे.