महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ डिसेंबर ।। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर, पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि किऑक्सचा सुळसुळाट वाढला. गल्लीबोळात फ्लेक्सने गर्दी केली. या विद्रुपीकरणाची दखल घेत महापालिकेने गेल्या सात दिवसांत विशेष कारवाई मोहीम राबवत दोन अनधिकृत होर्डिंगधारकांवर गुन्हे दाखल केले आहेत. चारजणांकडून 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारवाईदरम्यान, तब्बल 8 हजार 335 फ्लेक्स, किऑक्स जप्त केले आहेत.
पिंपरी-चिंचवड हद्दीतील किवळेत 17 एप्रिल 2023 मध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळून 5 मजुरांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर जागे झालेल्या महापालिकेने शहरातील 174 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले. त्यामुळे शहरात सद्य:स्थितीत 1 हजार 300 होर्डिंग अधिकृत असल्याचा दावा महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचा आहे. महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात पिंपरी-चिंचवड आउटडोअर असोसिएशनने दावा दाखल केला होता. न्यायालयाने नियमानुसार असलेल्या होर्डिंगधारकांना परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्या होर्डिंग व्यावसायिकांकडून आवश्यक कागदपत्रांसह परवाना शुल्क भरून घेण्यात येत आहे. तरीही शहरात अनधिकृत होर्डिंग लावले जात असल्याचे चित्र आहे. त्यात विधानसभा निवडणुकीनंतर गल्लीबोळात, चौकात, मोकळ्या जागेत बेकायदा फ्लेक्स व किऑक्स लावण्यात आले. नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन करणारे हे फ्लेक्स व किऑक्स होते. या फ्लेक्स व किऑक्सच्या गर्दीमुळे शहर विद्रुप झाले होते.
त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहराभर विशेष कारवाई मोहिम राबविली. त्यात बेकायदा होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि किऑक्सवर कारवाई केली. परवाना निरीक्षकांसह क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ही कारवाई केली. कारवाईत 8 हजार 335 फ्लेक्स, किऑक्स काढून जप्त केले.
प्रशांत तलवारे, मुकेशकुमार सहा, सुखवानी बिल्डर्स, राहुल गुट्टे, श्रीहरी शिंपी या चार जणांकडून 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रवींद्र रामदास काळोखे यांच्यावर चिखली पोलिस ठाण्यात आणि श्रीनिवास मडगुंजी यांच्यावर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाई यापुढेही सुरू राहणार
पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदा होर्डिंग, फ्लेक्स व किऑक्स लावणार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी सात दिवस विशेष कारवाई मोहीम हाती घेण्यात आली. त्यात चार जणांवर दंड करण्यात आला आहे. तर, दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई या पुढेही सुरू राहणार आहे, असे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
कारवाई मोहीम
अनधिकृत होर्डिंग, बॅनर, फ्लेक्सची संख्या : 1 हजार 573
अनधिकृत किऑक्सची संख्या : 6 हजार 762
एकूण दंड वसूल : 46 हजार 500
गुन्हे दाखल : 2