महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ डिसेंबर ।। छत्रपती संभाजीनगर ।। पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च २०२५ पर्यंत होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले.
एका विवाह सोहळ्यासाठी ते शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी शहरात आले होते. यावेळी विविध विषयांवर त्यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली असता, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी शहरात या निवडणुका स्वबळावर लढविण्याची मागणी केली.
कोरोना आणि आरक्षण या कारणांनी एप्रिल २०२० पासून राज्यात अनेक ठिकाणी महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत. आता लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकाही झाल्या. त्यामुळे पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुका कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे शहरात आले असता, पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली. यावर येत्या मार्चपर्यंत महापालिका निवडणुका होण्याचे संकेत त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. यानंतर शहराध्यक्ष बोराळकर यांनी छत्रपती संभाजीनगरातील महापालिका निवडणुका या स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी केली. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्मितहास्य केले.