महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ डिसेंबर ।। ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या डे-नाईट कसोटीत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या 175 धावांत गारद झाला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचे लक्ष्य मिळाले. हे माफक आव्हान यजमान संघाने एकही विकेट न गमावता आरामात गाठले आणि सामना 10 गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने नाबाद 12 आणि नॅथन मॅकस्विनीने नाबाद 10 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
भारताचा दुसरा डाव 175 धावांवर संपुष्टात
तत्पूर्वी, आज (दि. 8) भारताने सामन्याच्या तिस-या दिवशी 5 बाद 128 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पण अवघ्या 47 धावांतच उर्वरीत 5 विकेट गमावल्या. सहावा धक्का ऋषभ पंतच्या रूपाने बसला. दिवसाच्या पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंत (28) स्टार्कचा बळी ठरला. यानंतर अश्विन काही विशेष करू शकला नाही आणि सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हर्षित राणा खातेही उघडू शकला नाही. त्याची विकेट कमिन्सने घेतली. नितीश रेड्डीला पुन्हा एकदा अर्धशतकाने हुलकावनी दिली. त्याने 47 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 42 धावा केल्या. तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. शेवटी बोलंडने सिराजला हेडकरवी झेलबाद करून भारताचा डाव 175 धावांवर संपुष्टात आणला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार कमिन्सने पाच, तर बोलंडने तीन विकेट्स घेतल्या. स्टार्कने दोन विकेट घेतल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीसमोर (6/48) भारतीय डाव 180 धावांत गडगडला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या (140) बळावर 337 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर भक्कम आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. मात्र, नितीश रेड्डीने झुंझार खेळी करून भारताचा डावाने पराभव टाळला.
कमिन्सचे 5 बळी
कर्णधार पॅट कमिन्सने सलामीवीर केएल राहुलला बाद करून भारताच्या दुसऱ्या डावात विकेट्सचे खाते उघडले. यानंतर त्याने रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, नितीश रेड्डी आणि हर्षित राणा यांच्या विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने 14 षटके टाकली आणि 57 धावा दिल्या. त्याच्याशिवाय स्कॉट बोलंडने 3 बळी घेत भारताचा दुसरा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
ॲडलेड मैदानावरील रेकॉर्ड कायम
ॲडलेड येथे पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाने आठवा विजय नोंदवला. विशेष म्हणजे कांगारू संघाने या मैदानावर 8 डे-नाईट कसोटीत सामने खेळले आहेत. या मैदानावरील त्यांची विजयाची टक्केवारी 100 आहे. ऑस्ट्रेलियाने एकूण 13 पिंक बॉल कसोटी खेळल्या असून त्यातील 12 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, भारताने आतापर्यंत 5 पिंक बॉल कसोटी खेळल्या आहेत, ज्यातील 2 सामन्यात पराभव झाला असून 3 सामने जिंकले आहेत.
टीम इंडियाचा ॲडलेड मैदानावरील डे-नाईट कसोटीतील हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी, 2020-21 दौऱ्यात, ॲडलेड कसोटीत भारत अवघ्या 36 धावांत ऑलआऊट झाला होता.
स्टार्कचा पहिल्यांदाच विकेट्सचा ‘पंच’
भारताच्या पहिल्या डावात स्टार्कने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर त्याने केएल राहुल (37), विराट कोहली (7), रविचंद्रन अश्विन (22), हर्षित राणा (0) आणि नितीश राणा (42) यांना आपले बळी बनवले. त्याने 14.1 षटकात 48 धावा देत हे 6 बळी घेतले. भारताविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील त्याची 5 विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
हेडचे भारताविरुद्ध दुसरे कसोटी शतक
हेडने पहिल्या डावात 141 चेंडूंचा सामना करत 140 धावा केल्या. त्याला मोहम्मद सिराजने बोल्ड केले. त्याने आपल्या शतकी खेळीत 17 चौकार आणि 4 षटकार मारले. हेडचे कसोटी कारकिर्दीतील हे आठवे आणि भारतीय संघाविरुद्धचे दुसरे शतक ठरले. गुलाबी चेंडूच्या कसोटीतील हेडचे हे तिसरे शतक आहे. डे-नाईट टेस्टमध्ये फक्त लॅबुशेनने (4) त्याच्यापेक्षा जास्त शतके झळकावली आहेत.