महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ डिसेंबर ।। न्यूझीलंड क्रिकेट संघाला मोठा धक्का रविवारी बसला आहे. न्यूझीलंडला मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मलिकेतील दुसऱ्या सामन्यात तिसऱ्याच दिवशी ३२३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत मिळवलेला हा धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय आहे. याशिवाय इंग्लंडने तीन सामन्यांची कसोटी मालिकाही २-० अशी विजयी आघाडी घेत खिशात टाकली आहे. दरम्यान, या पराभवामुळे न्यूझीलंडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
न्यूझीलंड आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ (WTC 2023-25) स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. न्यूझीलंड या पराभवामुळे सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांचे आता ४४.२३ टक्केवारी झाली आहे. त्यांची आता केवळ इंग्लंडविरुद्धची अखरीची कसोटी बाकी असल्याने ते ६० टक्केवारीपर्यंत पोहचू शकणार नाहीत.
England take the win and claim the Tegel Test series in Wellington. We head to Hamilton for the third and final Test of the series starting on Saturday. Catch up on all scores | https://t.co/BM7kPKUW2C 📲 #NZvENG #CricketNation #Cricket pic.twitter.com/yLJ2BJ2bSA
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 8, 2024
त्यामुळे ते अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. इंग्लंडने या विजयासह मात्र ४५.२४ टक्केवारीसह ५ वे स्थान पाँइंट्स टेबलमध्ये मिळवले आहे. पण त्यांचे या स्पर्धेतील आव्हान यापूर्वीच संपले आहे.
सध्या अंतिम सामन्याच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया (६०.७१), दक्षिण आफ्रिका (५९.२६), भारत (५७.२९) आणि श्रीलंका (५०) आहेत.
न्यूझीलंडचा पराभव
या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडसमोर ५८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात ५४.२ षटकात २५९ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टॉम ब्लंडेलने १०२ चेंडूत ११५ धावांची शतकी खेळी केली होती.
तसेच नॅथन स्मिथने ४२ धावा केल्या. परंतु, बाकी कोणाला खास काही करता आले नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
तत्पुर्वी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद २८० धावा केल्या होत्या. त्याच्याकडून हॅरी ब्रुकने सर्वाधिक १२३ धावा केल्या होत्या, तर ऑली पोपने ६६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने ४ विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर न्यूझीलंड संघ पहिल्या डावात १२५ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे इंग्लंडने १५५ धावांची आघाडी घेतली होती. न्यूझीलंडकडून केवळ केन विलियम्सने ३० धावांचा टप्पा ओलांडताना ३७ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कार्स यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर इंग्लंडने दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित केला होता. या डावात जो रुटने १०६ धावांची शतकी खेळी केली. तसेच बेन डकेटने ९२ आणि जाकोब बेथेलने ९६ धावांची खेळी केली. हॅरी ब्रुकनेही ५५ धावांची खेळी केली. बेन स्टोक्स ४९ धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडकडून टीम साऊदी आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.