Ganpatipule Tourism : विकेंडला पर्यटन स्थळ बहरली ; गणपतीपुळेत पर्यटन व्यवसायाला बहर; दापोली, अलिबागला पसंती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.९ डिसेंबर ।। तालुक्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे पर्यटनस्थळावर (Ganpatipule Tourism) मुंबई-पुणेकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचा राबता वाढत आहे. प्रत्येक विकेंडला गणपतीपुळेत पर्यटक (Tourist) येत असल्यामुळे येथील पर्यटन व्यवसाय बहरला आहे. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवसात सुमारे १० लाखाहून अधिक उलाढाल होत आहे.

मात्र मिऱ्या-नागपूरसह मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांची (Mumbai-Goa National Highway) कामे सुरु असल्यामुळे रत्नागिरीतील किनाऱ्यांकडे येणारा पर्यटक अलिबागसह दापोलीकडे वळत आहे. दोन्ही महामार्गांची कामे पूर्ण झाल्यानंतर गणपतीपुळेसह आजुबाजूच्या पर्यटनस्थळांवरील राबता वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

फेंगल चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर कोकणातील वातावरण पुन्हा निवळलेले आहे. थंडीची चाहूल लागली असून सकाळच्या सत्रात पुन्हा थंडी जाणवत आहे. दापोलीत पारा १४ अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे तिकडे थंडीचा जोर वाढला आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण, पाऊस आणि उष्मा अशी परिस्थिती होती. या वातावरणाचा पर्यटनावरही परिणाम झाला. शुक्रवारी शाळा, महाविद्यालयांना महापरिनिर्वाण दिनाची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार, रविवार जोडून सुट्ट्या आल्या. त्यामुळे पर्यटनाचा चांगली संधी मिळाली होती.

मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची पावले आपसुकच गणपतीपुळेकडे वळली होती. किनाऱ्यावर मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतानाच समुद्र सैर, किनाऱ्या घोडागाडीतून फेरी यासह सायंकाळी सुर्यास्त पाहण्यासाठी सर्व वयोगटातील पर्यटक गणपतीपुळे किनारी आलेला आहे. शनिवारी सकाळीच अनेकजणं दाखल झाले होते. एक दिवस मुक्काम करुन पर्यटक कुटुंब रविवारी सायंकाळी परतीच्या मार्गाला लागलेली होती. त्यामुळे लॉजिंगसह हॉटेल, किनाऱ्यावरील फेरीवाले, बोटींग करणारे अशा व्यावसायिकांचा चांगला फायदा झाला आहे.

परंतू आठवड्याचे पाच दिवस पर्यटन स्थळावर गर्दीचा लवलेशही नसतो. पण दोन दिवस गर्दी असे चित्र सध्या आहे. त्याचा मोठा फायदा मिळत नसला तरीही उलाढाल होते राहते. दरम्यान, २५ डिसेंबरला नाताळची सुट्टी सुरू होणार आहे. त्यासाठी पर्यटकांकडून आतापासूनच बुकिंग करण्यास आरंभ झालेला आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात गर्दी जिल्ह्यातील सर्वच किनारी भागात पाहायला मिळते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *