महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० डिसेंबर ।। जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचं गणित अधिक किचकट झालेलं पाहायला मिळतंय. टेम्बा बवूमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीतही श्रीलंकेला पराभूत केले. या पराभवाचा श्रीलंकेपेक्षा टीम इंडियाला मोठा धक्का बसला, कारण WTC Standings मध्ये रोहित शर्मा अँड टीम तिसऱ्या स्थानावर घसरली. आफ्रिकेने अव्वल स्थानी झेप घेताना फायनलच्या दिशेने पाऊल टाकले आहे आणि भारतासह ऑस्ट्रेलियाचेही समीकरण बिघडवले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या या पर्वातील १० कसोटी सामने शिल्लक आहेत आणि अजूनही फायनलचे दोन संघ ठरलेले नाहीत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ ६३.३३ टक्क्यांसह सध्या अव्वल स्थानावर आहे आणि आता त्यांना घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. आफ्रिकेने नुकत्याच पार पडलेल्या कसोटीत श्रीलंकेवर २-० असा दणदणीत विजय मिळवून अव्वल क्रमांका पटकावला. आता त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटींपैकी एक विजय WTC Final मध्ये जागा पक्का करण्यासाठी पुरेसा आहे. पाकिस्तानविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तरी त्यांची टक्केवारी ही ६१.११ इतकी राहिल आणि अशा परिस्थितीत भारत किंवा ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकाचा पत्ता कट होईल.
दोन्ही कसोटी सामने ड्रॉ राहिल्यास आफ्रिका ५८.३३ टक्क्यांसह हंगाम संपवतील. त्याचवेळी जर भारताने BGT मालिका ३-२ अशी जिंकल्यास आणि ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध २-० असा विजय मिळवल्या, ऑस्ट्रेलिया ( ६०.५३) व भारत ( ५८.७७) हे दोन्ही संघ फायनल खेळतील. आफ्रिकेने मालिका १-० अशी गमावली, तर ऑस्ट्रेलियाने उर्वरित ५ कसोटींत एकपेक्षा जास्त विजय मिळवू नये साठी त्याना प्रार्थना करावी लागेल.
श्रीलंकेचे दोन कसोटी ( वि. ऑस्ट्रेलिया) सामने शिल्लक आहेत आणि त्यांची ४५.४५ अशी टक्केवारी आहे. श्रीलंकेने उर्वरित दोन्ही कसोटी सामने जिंकले, तर ती ५३.८५ टक्क्यांपर्यंतच मजल मारू शकतात आणि अशा परिस्थितीत त्यांचे फायनल खेळणे अवघड आहे.
भारतीय संघ ५७.२९ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचे ३ कसोटी सामने शिल्लक आहेत. भारताला फायनलच्या शर्यतीत कायम राहायचे असेल तर त्यांना दोन विजय आणि एक ड्रॉ असा निकाल आवश्यक आहे. या निकालानंतर त्यांची टक्केवारी ६०.५३ इतकी होईल आणि ते WTC Final च्या अव्वल दोनमध्ये राहतील. श्रीलंकेविरुद्ध २-० असा विजय मिळवल्यानंतरही ऑस्ट्रेलिया ५७.०२ टक्क्यांसह स्पर्धेचा शेवट करतील. भारताने ही कसोटी मालिका ३-२ अशी जिंकल्यास ते ५८.७७ टक्क्यांसह फायनलचे स्थान पक्के करू शकतील. पण, जर भारताने ही मालिका २-३ अशी गमावली, तर त्यांची टक्केवारी ५३.५१ अशी होईल आणि अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांना भारताच्या पुढे जाण्याची संधी मिळेल. अशाही स्थितीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्ध दोन्ही सामने गमावल्यास आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यापैकी एक सामना ड्रॉ राहिल्यास भारताला संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलियाचा संघ ६०.७१ टक्क्यांसह भारताच्या पुढे आहे. त्यांना भारताविरुद्ध ३ आणि श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यांना भारताविरुद्धच्या ३ पैकी २ कसोटींत विजय मिळवणे गरजेचे आहे आणि तसे झाल्यास ते फायनलसाठी सहज पात्र ठरतील. मग ते श्रीलंकेविरुद्ध हरले तरी चालेल. पण, त्यांचा २-३ असा पराभव झाल्यास भारत ५८.७७ टक्क्यांसह आगेकूच करू शकतो.