महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ डिसेंबर ।। 2024 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांमध्ये निरोप घेणार असून, त्यानंतर एका नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षात कैक नव्या गोष्टींची सुरुवात होणार असून, सामान्यांच्या जीवनावरही याचे परिणाम होणार आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांमागोमाग राज्यात सत्तास्थापना झाली आणि आता राज्य शासनानं एक अतिशय मोठा आणि थेट नोकरदार वर्गाच्या जीवनावर परिणाम करणारा एक निर्णय घेतला आहे.
हा निर्णय आहे सुट्टीचा. 2025 या वर्षासाठी राज्य शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना एका वाढीव सुट्टीची खास भेट देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राज्यातील ‘लाडक्या बहिणी’ यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार राज्यात येणाऱ्या वर्षात म्हणजेच 2025 मध्ये भाऊबीजेला सार्वजनिक सुट्टी मिळणार असून, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना भाऊबीजेच्या सुट्टीच सरकारकडून मिळालेली ही खास भेट असून, 23 ऑक्टोबर 2025 म्हणजेत भाऊबीजेच्या दिवशी गुरुवारी ही सुट्टी मिळणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळं दरवर्षी सादर होणाऱ्या एकूण 24 सुट्ट्यांमध्ये अधिक एका सार्वजनिक सुट्टीची भर पडल्याचं आता स्पष्ट होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकींमध्ये राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’नी दिलेल्या यशामुळे ही सुट्टी जाहीर करण्यात आल्याची चर्चा आहे.