भाजपचे मंत्रिपदासाठी संभाव्य चेहरे ठरले ! अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ डिसेंबर ।। ‘मी आमच्या (भाजपच्या) नेत्यांना भेटायला आलो आहे. आमच्या पक्षाकडून मंत्री कोण असतील? त्या संदर्भात आमची चर्चा झाली. भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्चित झाली असून आमचे संसदीय मंडळ आणि पक्षाचे केंद्रीय नेतृत्व अंतिम निर्णय घेईल’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांकडून कोण मंत्री राहतील, हे ते दोघे ठरवतील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला मिळणाऱ्या खात्यांबाबत नाराज असल्याची चर्चा असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री अमित शहा यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीतूनच फोन केला. त्यानंतर शहा यांनी शिंदे यांच्याशी विशेषतः गृहखात्याबाबत ‘चर्चा’ केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी शिंदे यांच्या वतीने भाजप श्रेष्ठींनी ठरविलेले खातेवाटपाचे सूत्र मान्य असल्याचा निरोप दिल्लीत आला. शिंदे यांच्या निरोपानंतर फडणवीस यांनी सुहास्य वदनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टाचार भेट घेऊन त्यांना शिवरायांचा अश्वारूढ पुतळा भेट दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात काल, बुधवारी रात्री दिल्लीत झालेल्या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि अमित शहा उपस्थित होते, उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीत नव्हते हे फडणवीस यांनी स्पष्ट केले. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे सांगून फडणवीस यांनी नजीकच्या काळात विस्तार होईल असेही संकेत दिले.

‘मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींची भेट घ्यायची असते. त्यानुसार मी त्यांची भेट घेतली आहे. आज सकाळी माझी पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्रासंदर्भात दीर्घ चर्चा झाली. मी पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतले. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेकरता हे राज्य गतिमान ठेवणे आवश्यक आहे,’ असे फडणवीस म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी, केंद्राकडून महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले असेही फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *