महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। थंडीचा बालेकिल्ला असणार्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घसरण होत आहे. या थंडीचा कडाका पर्यटकांना महाबळेश्वरची नजाकत दाखवून देत आहे. या कडाक्याच्या थंडी सोबतच गार वारे वाहत असल्याने पर्यटनास आलेल्या पर्यटकांसह स्थानिकांना हुडहुडी भरली आहे. महाबळेश्वरमधील वेण्णालेक परिसरात तापमान 7 अंशांपर्यंत खाली आले आहे.
महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून, या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टिसौंदर्य पाहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत चालले असून, वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. महाबळेश्वर सोडून 20 कि.मी. खाली गेल्यावर असणारी बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असणारी गुलाबी थंडी यातील फरक अनुभवायास मिळत आहे. सायंकाळी वेण्णालेकसह लिंगमळा परिसर सर्वत्र हॉटेल्स रेस्टॉरंट बाहेर शेकोटी पेटवून कडाक्याच्या थंडीत शेकताना अनेकजण पाहावयास मिळत आहेत; तर अनेक हॉटेल्समध्ये बॉर्न फायर देखील पेटवण्यात येत आहेत. मुख्य बाजारपेठेत उबदार कपड्यांची मागणी वाढली असून स्वेटर, शाल, जॅकेट खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. शालेय सहलींमुळे सध्या बाजारपेठेत मोठी रेलचेल असल्याचे चित्र आहे.