महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। राज्यात तापमानाचा पारा घसरला असून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. थंडीमुळे नागरिक चांगलेच गारठले आहेत. राज्यात सगळीकडे शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कोणी जाड कपडे, कोणी स्वयटर, कोणी कान टोपी घातल्याचं सगळीकडे पाहायला मिळत आहे. उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडी चांगलीच वाढली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्यांनी चादर पसरवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. राज्यातील धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात ४.१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
धुळ्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला असून आज धुळ्यात ४.१ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात नीचांकी तापमानाची नोंद धुळ्यात झाली आहे. धुळ्यात तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट सातत्याने बघायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापासून धुळ्यातील तापमानामध्ये प्रचंड घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या थंडीचा सामना आता धुळेकरांना करावा लागत आहे. या हाड गोठवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा ८ अंशापेक्षा कमी नोंदवला गेला आहे.
उष्णतेसाठी ओळखले जाणारे चंद्रपूर शहर सध्या कडकडीत थंडी आणि धुक्याची अनुभूती घेत आहे. वातावरणात प्रचंड गारठा असून तापमान ११ अंशावर आले आहे. उन्हाळ्यात ४८ डिग्री तापमान सहन करणारे चंद्रपूरकर सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. मागील तीन-चार दिवसांपासून धुळ्यामध्ये थंडी पडू लागली. मात्र आज सकाळी अचानक पारा ११ अंशावर आला. त्यामुळे हुडहुडी भरणे साहजिकच होते. थोड्याफार थंडीला न जुमानणारे चंद्रपूरकर आता चक्क शेकोट्यांचा आधार घेत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून जालना जिल्ह्यात थंडीचे कमबॅक झाले असून जालना जिल्ह्यात थंडीचा पारा वाढला आहे. जिल्हयात थंडीचा जोर वाढला असून आज आणि उद्या या हंगामातील तापमानाचा निच्चांक नोंदवला जाण्याची शक्यता आहे. वाढत्या थंडीमुळे जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहे.
परभणीत तपामनात मोठी घट झाली आहे. परभणीत थंडीने यावर्षीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आज परभणीच सर्वात निचांकी तापमान ४.६ अंशावर आले आहे. काल परभणीच तापमान ७.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. आज मात्र तापमानात मोठी घट झाली आहे. पुढील एकदोन दिवस असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे. यंदाच्या मौसमातल हे सर्वात निचांकी तापमान असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम आहे. जिल्ह्यात सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान ७ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तोरणमाळ येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापी नदीच्या काठावर सारंगखेडा येथे भरलेल्या घोडे बाजारात थंडीपासून बचावासाठी घोड्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. घोडयाना उबदार झूल आणि विशेष खुराक दिले जात आहे.