Loksabha Election: रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नावावर शिक्का

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। Loksabha Election: रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चांचं सत्र सुरू होतं. अखेर या जागेचा तिढा सुटल्याची माहिती आहे. हा मतदारसंघ भाजपच्या (BJP) पारड्यात पडला आहे. अखेर या जागेवर नारायण राणेंचं नाव जाहीर झालं आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नसताना या मतदारसंघात प्रचाराचा धडाका मात्र जोरात सुरू झाला होता. सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडून द्या असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मतदारांना आवाहन केलं होतं.

त्यामुळे नारायण राणेंच संभाव्य उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. तशा प्रकारचा प्रचार देखील केला जातं होता. दरम्यान आज भाजपने अधिकृत उमेदवाराची घोषणा केली आहे. ही जागा भाजपच्या पारड्यात पडली आहे. या जागेवर नारायण राणे अधिकृत उमेदवार जाहीर झाले आहेत.

उदय सामंत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर तसेच राणेंची उमेदवारी घोषित झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांना फोन करून आभार व्यक्त केले आहेत.

शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर आज महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या कामाला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात बेरोजगारी, रिफायनरीसह विविध प्रकल्प, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था, महागाई यांसह अनेक मुद्दे प्रचारात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ताधाऱ्यांवर कोणताही विकास केला नसल्याचा आरोप केला जात आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राऊत हे विकास प्रकल्पांना हेतुपुरस्सर विरोध करीत असल्याची टीका सत्ताधारी करीत आहेत.

रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात २०१९ मध्ये विनायक राऊत आणि डॉ.नीलेश राणे यांच्यामध्ये लढत झाली होती. राऊत यांनी शिवसेना -भाजप युतीकडून लढविली होती तर राणे यांनी स्वाभिमान पक्षातून उभे होते. या लढतीत राऊत यांनी बाजी मारली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *