महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ डिसेंबर ।। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘फुलवंती’खूप गाजत आहे. प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्रीसोबत चांगली कवयित्री, नृत्यांगना आणि व्यावसायिका देखील आहे. तसेच ‘फुलवंती’ या चित्रपटामुळे तिने निर्माती क्षेत्रातही पदार्पण केले आहे. नुकताच अशा हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) नवोदित कवयित्री म्हणून सन्मान करण्यात आला आहे.
प्राजक्ता माळीला ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ चा ‘सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार’ मिळाला आहे. या मोठ्या पुरस्काराने प्राजक्ताला गौरविण्यात आले आहे. यासंबंधित एक खास पोस्ट प्राजक्ताने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला तिने भावुक कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ताला हा सन्मान मिळाल्यामुळे चाहते खूप खुश पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता माळी भावुक पोस्ट
“पुरस्कार अनेक मिळतात पण साहित्य क्षेत्रातील संस्थांची मातृसंस्था असलेल्या “महाराष्ट्र साहित्य परिषदेचा” पुरस्कार मिळणं हे माझं अहोभाग्य…महाराष्ट्र साहित्य परिषद…सुनीताबाई स्मृती साहित्य पुरस्कार…नवोदित कवयित्री….स्थळ -माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे…”
“याच ठिकाणी प्राजक्तप्रभाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं होतं. पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालं अशा ज्येष्ठ कवी प्रविण दवणे यांच्याच हस्ते पुरस्कार मिळाला. योगायोग… अभिनेत्री असताना कवयित्री म्हणून सन्मान मिळणं हे दुर्मिळ…पाठीवर शाबासकीची थाप, पुढील लेखनासाठी प्रोत्साहन…मसाप चे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे विशेष आभार…”