महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ डिसेंबर ।। उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. राज्यातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून धुळ्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यामधील तापमान ४ अंशावर पोहचले आहे. राज्यात पसरलेल्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. महाराष्ट्र गारठला असून सगळीकडे शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यातील ९ जिल्ह्यांना हवामान खात्याने थंडीचा यलो अलर्ट दिला आहे. जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, पुण्याचा घाटमाथा आणि गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे. धुळ्यात तापमानाचा पारा ४ अंशापर्यंत घसरला आहे. पुण्यात ७.८ आणि अहमदनगरमध्ये ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे –
पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची तीव्रता वाढली आहे. तापमानाचा पारा ७.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या आहेत. आज वातावरण सूर्यप्रकाशित राहणार आहे. तर कमाल तापमान २८ अंशांवर राहील. त्यामुळे दिवसाही हवेत काहीसा गारवा जाणवणार आहे.
परभणी –
परभणीत तपामनात मोठी घट झाली आहे. परभणीत थंडीने यावर्षीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आज परभणीत सर्वात निचांकी तापमान ४.१ अंशावर आले आहे. काल परभणीच तापमान ४.६ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले आहे. आज मात्र तापमानात मोठी घट झालीय. पुढील एक- दोन दिवस असंच तापमान राहण्याचा अंदाज आहे. रब्बीतील ज्वारी, गहू, हरबरा पिकांना या थंडीचा फायदा होणार असून यंदाच्या मौसमातल हे सर्वात निचांकी तापमान असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन हवामान विभागाने केले आहे.
धुळे –
धुळ्यात तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. धुळ्यात ४ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. हाड गोठवणाऱ्या थंडीचा धुळेकरांना सामना करावा लागत आहे. धुळ्यात दिवसेंदिवस तापमानात घट होत आहे.
मनमाड –
मनमाड परिसरात सध्या थंडीचा जोर वाढलेला असल्याने तापमानाचा पारा १० अंशावर पोहचलेला आहे. त्यामुळे पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर धुकं आणि दव पडत असल्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर होत असून शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या गव्हाच्या पिकावर सध्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी चिंतेत आला आहे.
निफाड (नाशिक) –
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. ओझर HAL येथे ३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात ५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उब मिळवण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. थंडीचा कडाका कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.