‘या’ जिल्ह्यांत पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० ऑगस्ट – राज्यात दोन दिवस पावसानं उसंत घेतल्यानंतर पुन्हा एकदा 10 ते 13 ऑगस्ट मुसळधार पवासाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल आणि मराठवाड्यात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असं सांगण्यात आलं आहे.

4 ते 6 ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पवासामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसानं तर पूरस्थिती निर्माण होते की काय? असा प्रश्न समोर उभा होता. मात्र पावसाचा जोर दोन दिवस ओसरल्यानं स्थिती पूर्ववत होण्यास मदत झाली.

आता पुन्हा एकदा 10 ते 13 ऑगस्ट विदर्भ आणि कोकणांत मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळच्या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

5 ऑगस्टला झालेल्या पावसानं मुंबईसह उपनगरांमध्ये नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक घरांमध्येही पाणी शिरलं. तर राज्यातील अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र पुन्हा तीन दिवस पावसानं दांडी मारल्यानं स्थिती नियंत्रणात आली. आता पुन्हा एकदा पुढचे तीन दिवस राज्यात विदर्भ आणि कोकणात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *