संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून ‘जम्बो कोविड केंद्रा’चे काम तातडीने पूर्ण करा; उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे -दि.९ ‘कोरोना’ संसर्गाच्या संभाव्य प्रादुर्भावाबरोबरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच ‘जम्‍बो कोविड केंद्रा’चे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी येथील आण्णासाहेब मगर क्रीडांगण, शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) प्रांगण तसेच महाळुंगे-बालेवाडी स्टेडियम येथे उभारण्यात येत असलेल्या कोविड केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष कार्यस्थळी जाऊन पाहणी केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘जम्बो कोविड केंद्रा’ची उभारणी करताना दर्जेदार काम करण्यावर भर असला पाहिजे. ‘कोरोना’ संकटाच्या काळात नागरिकांना उत्तम आरोग्यविषयक सर्व सोईसुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. गारपीट, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करुनच रुग्णालय उभारणीचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी आण्णासाहेब मगर क्रीडांगण तसेच शिवाजी नगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओइपी ) प्रांगणात जम्बो कोविड केंद्र उभारणी करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली. यामध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचना, ऑक्सिजनयुक्त, आयसीयू खाटा, कृत्रिम श्वसनयंत्रेयुक्त (व्हेंटिलेटर) असलेले सर्व सोई सुविधा युक्त कोविड केंद्र उभारण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा, दोन खाटांमधील अंतर, कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यात येणाऱ्या चाचण्या, विद्युतीकरण, वाहनतळ, शौचालय, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, डॉक्टर व परिचारिका यांच्या राहण्याची व भोजनाची सोय, खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात कोविड केंद्राच्या आजूबाजूने साठणारे पाणी आणि त्‍याचा निचरा करण्याची व्यवस्था आदी बाबींसह पायाभूत सुविधांबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *