Online Shopping : ऑनलाइन खरेदीचा मनस्ताप ; रिटर्नसाठी कंपन्यांनी बदललेल्या धोरणांचा ग्राहकांना फटका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ एप्रिल ।। Online Shopping : जितक्या सुविधा तितकेच कधी कधी दुष्परिणामही भोगावे लागतात. ऑनलाइन खरेदीच्या बाबतीत ग्राहकांचे असेच काहीसे होताना दिसते. ऑनलाइन खरेदीवर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला किमान एकदातरी कंपन्यांच्या धोरणांचा फटका बसला आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही कंपनीच्या ग्राहक हेल्पलाइन क्रमांकाशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे, समस्या कायम राहात असून कंपन्यांच्या अशा ग्राहक विरोधी धोरणाचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

बनावट घड्याळ विकणे आले अंगलट
एका ग्राहकाला बनावट घड्याळ विकणे ॲमेझॉन कंपनीच्या चांगलेच अंगलट आले आहे. ब्रँडेड कंपनीचे घड्याळ स्वस्त दरात विकत घेण्यासाठी इंटरनेटवर नागपुरातील या ग्राहकाने शोधाशोध केली. त्यांना आवडलेले १ हजार ८९८ रुपयांचे घड्याळ कंपनीच्या वेबसाइटवर दिसले. मात्र, ब्रँडेड ऐवजी सर्वसाधारण घड्याळ हाती आल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या उत्साहावर पाणी फेरले. या प्रकरणात नागपूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने कळमना पोलिस ठाण्याला ॲमेझॉन कंपनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले होते.

इथे सहज करू शकता तक्रार
ऑनलाइन शॉपिंग करताना फसवणूक झाल्यास राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन नंबर १८००११४००० किंवा १४४०४ वर तक्रार करू शकता. तुम्ही सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या क्रमांकावर कॉल करू शकता.

वस्तू ‘रिटर्न’ करणे डोकेदुखी
एका शॉपिंग कंपनीकडून वस्तू मागविणाऱ्या ग्राहकांना आता एका नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना मागविलेल्या वस्तू बदलून (रिटर्न) हव्या असल्यास आता त्यासाठी वस्तूमधील त्रुटीसह आपले ओळखपत्र (आयडी प्रुफ) व बदलून हव्या असलेल्या वस्तूचा फोटो अपलोड करावा लागतो. कारण, शॉपिंग कंपनीने आपल्या धोरणामध्ये बदल केले असून ओळखपत्र सादर केल्यावर त्याची पडताळणी थर्ड पार्टीद्वारे करण्यात येईल, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे, ग्राहकांच्या वैयक्तिक डेटा सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. यापूर्वी, वस्तू बदलून हवी असल्यास ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ‘रिटर्न रिक्वेस्ट’ करण्याची सुविधा उपलब्ध होती.

ऑनलाइन करता येईल तक्रार
ऑनलाइन तक्रार करण्यासाठी तुम्हाला https://consumerhelpline.gov.in/user/signup.php साइटवर जावे लागेल. साइटवर गेल्यावर सर्वात आधी लॉग इन करावे लागेल. पुढे सर्व आवश्यक माहितीसह तक्रारीचा फॉर्म भरा. त्यानंतर तुमच्या तक्रारीवर कारवाई होईल.

न्यायासाठी दिल्लीवारी
केंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी निर्णय घेऊनसुद्धा राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या खंडपीठाची स्थापना शहरामध्ये झाली नाही. ग्राहकांना राष्ट्रीय आयोगासमक्ष दाद मागायची असल्यास दिल्ली गाठावी लागते. तसेच, प्रकरण दाखल केल्यानंतर प्रत्येक वेळी त्याचा पाठपुरावा करणे देखील शक्य होत नाही. दिल्लीमध्ये बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येक वकिलाला प्रत्येक सुनावणीच्या वेळी किमान २५ हजार रुपयांचा खर्च येतो. त्याचा फटका पक्षकार ग्राहकाला बसतो. नागपूरसह चेन्नई, कलकत्ता आणि जयपूर येथे या आयोगाची स्थापना झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली प्रकरणे निकाली लागू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *