महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। जगभर साजर्या होणार्या नाताळाला (Merry Christmas 2024) गोव्यात (Goa) ‘मिडनाईट मास’ने सुरुवात झाली. यासाठी गोव्यातल्या अनेक चर्चेसमध्ये विशेष मास झाले. मध्यरात्री या मासला सुरुवात होऊन ते रात्री उशिरापर्यंत चालू होते. यासाठी जुने गोवेतल्या सेंट फ्रान्सिस झेवियर, बासिलिका ऑफ बाम जीजस, पणजीच्या सेंट इमॅक्युलेट, बिशप पॅलेस, डॉन बॉस्को व इतर चर्चेसमध्ये हजारो लोकांनी सहभाग नोंदवीत येशूचे स्मरण केले.
‘जिंगल बेल’चे सूर हवेत विरू लागले की ख्रिसमसची चाहूल लागते. सांताक्लॉजच्या रूपाने येणारी आनंदाची पर्वणी सर्वांनाच मोहित करणारी असते. अशा या सर्वांच्या लाडक्या उत्सवाची राज्यात धूम आहे. हे सेलिब्रेशन पुढे नवीन वर्षाच्या सुरुवातीपर्यंत चालू राहणार आहे. ख्रिसमस निमित्ताने बाजारपेठांमध्ये नागरिक आपल्याला हव्या असणा़र्या वस्तू खरेदी करताना दिसताहेत. नाताळच्या सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे स्टिमर्स, रिंग्स, वेल, बेल्ट, स्टार, ड्रम्स, क्रिप्स, मेटालिक बॉल, शायनिंग बॉल, हँगिग बॉल्स, आणि गिफ्ट देणारी ख्रिसमस ट्री व सांताक्लॉजने बाजारपेठा खुलून गेलेत. या फुललेल्या बाजारपेठा ग्राहकांनाही आकर्षित करताहेत.
अत्यंत पवित्र, आनंदाचा दिवस : फादर वोल्टर डिसा
पणजी चर्चचे फादर वोल्टर डिसा म्हणाले, आमच्यासाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि आनंदाचा दिवस आहे. मध्यरात्री येशू जन्माला येतो. त्याचा जन्म एका गोठ्यात होतो आणि त्यातून जगाच्या उद्धाराला सुरूवात होते. यासाठीच आम्ही हा जन्म सोहळा उत्साहात साजरा करतो. सुरुवातीला कॅरोल प्रार्थना होते आणि त्यानंतर बायबलचे वाचन होईल. मग नाताळच्या शुभेच्छा दिल्या जातील. बुधवारी सकाळी तीन प्रार्थनांचे आयोजन केले आहे. यात कोकणी, इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषेतील प्रार्थनांचा समावेश आहे. भाविक या प्रार्थनांमध्येही सहभागी होतील.