महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या तीन सामन्यांनंतर मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. आता मालिकेतील चौथा कसोटी सामना हा ‘बॉक्सिंग डे’ असणार आहे. हा सामना उद्या (26 डिसेंबर) पासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट म्हणजे काय? आणि या कसोटीमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी आहे? त्याचा आढावा.
‘बॉक्सिंग डे’ हे नाव कसे पडले?
ख्रिसमसच्या दुसर्या दिवशी म्हणजे 26 डिसेंबरला सुरू होणार्या कसोटी सामन्याला ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट मॅच असे म्हटले जाते. दक्षिण आफ्रिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये हा सामना खेळवला जातो. 1892 मध्ये मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या शेफिल्ड शील्ड सामन्याने क्रिकेटमधील ‘बॉक्सिंग डे’ कसोटीची सुरुवात झाली. भारताने आपली पहिली ‘बॉक्सिंग डे’ टेस्ट 1985 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली होती.
ख्रिसमसच्या दुसर्या दिवशी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यामुळेच मेलबर्नमध्ये खेळल्या जाणार्या या सामन्याला ‘बॉक्सिंग डे’ कसोटी असेही म्हटले जात आहे. ख्रिसमसच्या दुसर्या दिवशी श्रीमंत आणि मालकवर्ग समाजातील गरजू लोकांना बॉक्समधून गिफ्ट देतात. याशिवाय पाश्चिमात्य देशांमधील मुलांना वर्षभर मिळणार्या पॉकेटमनीमधून ते काही रक्कम सेव्हिंग करतात. त्यातून आपल्या आवडीच्या वस्तू आणून तो बॉक्स चर्चमध्ये जमा करतात. असे बॉक्स हे जगातील गरीब देशांतील मुलांसाठी पाठवले जातात, त्यामुळे या दिवसाला ‘बॉक्सिंग डे’ म्हणतात.
मेलबर्न मैदानावर गेली 10 वर्षे भारत ‘अजिंक्य’
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारताचा ऑस्ट्रेलियावर वरचष्मा आहे. गेल्या 10 वर्षांत हे मैदान भारतासाठी कसोटीत अजिंक्य किल्ला राहिले आहे. भारतीय संघाने 2014 पासून या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण तीन सामने खेळले असून, दोन जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या 10 वर्षांत ‘एमसीजी’मध्ये भारताविरुद्ध विजय नोंदवू शकला नाही. आकडेवारीवर नजर टाकल्यास भारताने या मैदानावर एकूण 14 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी चारवेळा विजय मिळवला असून, आठवेळा पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.
‘बॉक्सिंग डे’टेस्टमध्ये टीम इंडियाची कामगिरी
‘बॉक्सिंग डे’ टेस्टमध्ये भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. गेल्या पाच ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या निकालांचा विचार केल्यास, भारताचा हात वरचा आहे. 2014, 2018 आणि 2020 मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना (बॉक्सिंग डे टेस्ट) झाला. 2018 मध्ये भारताने 137 धावांनी विजय मिळवला होता, तर 2020 मध्ये भारताने 8 गडी राखून विजय मिळवला होता. त्याचवेळी, 2021 आणि 2023 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ‘बॉक्सिंग डे’ कसोटी खेळली गेली. भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकले होते.