महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३० डिसेंबर ।। नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी फुलून गेले आहे. मागील १५ दिवसांपासून महाबळेश्वर, पाचगणीसह परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट पर्यटकांनी फुलून गेली आहेत. नाताळपासून वाढू लागलेल्या या पर्यटकांच्या संख्येने आता गर्दीचे रूप धारण केले आहे.
नाताळची सुटी आणि नववर्ष स्वागतासाठी देशभरातील पर्यटकांची महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या पर्यटनस्थळाला पसंती असते. यंदाही पर्यटकांची पावले आपल्या लोकप्रिय पर्यटन स्थळाकडे वळाली आहे. त्या हॉटेल व्यावसायिकांसह बाजारपेठेतील व्यापारीवर्ग पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारच्या क्लृप्त्या लढविताना दिसतो.
कुठे आकर्षक फुलांची सजावट, तर कुठे रोषणाई केली जाते. अनेक रिसॉर्टवर नाताळ व नववर्षाचे औचित्य साधत विविध थीम, विविध गेमची धूम असते. नाताळ या ख्रिश्चन धर्मीयांच्या सणानिमित्त येथील जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अनेक रिसॉर्टवर नाताळबाबाची प्रतिकृती, तसेच ख्रिसमस ट्रीदेखील आकर्षकरीत्या सजवले आहेत. मागील आठवड्यापासून सर्वच हॉटेल, लॉजसह बंगले, फार्म हाऊस हाऊसफुल्ल झाले आहेत.
महाबळेश्वरमधील विविध पॉइंट, वेण्णा लेक, धार्मिक-ऐतिहासिक स्थळांसह, बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे. दरम्यान, वाढत्या गर्दीने महाबळेश्वरकडे येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे रविवारी पाहण्यास मिळाले. अरुंद रस्ता असलेल्या भागात वाहतुकीची कोंडीही होत असल्याचे दिसत आहे.