आदिमायेचे मंदिर उद्या रात्रभर खुले; सप्तशृंग गडावरील संभाव्य गर्दीमुळे ट्रस्टचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३० डिसेंबर ।। नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता सप्तशृंग गडावरील आदिमायेचे मंदिर मंगळवारी (दि. ३१) रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे दाखल होत देवीच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करतात. त्यामुळे देवी मंदिर ट्रस्टने मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर २ जानेवारीपर्यंत देवी मंदिर रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

साडेतीन शक्तिपीठापैकी अर्धपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी बुधवारपासूनच (दि. २५) गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शाळांना नाताळच्या सुट्ट्या असल्याने गडावर भाविकांची सहकुटुंब दर्शनासाठी गर्दी होत आहे. वर्षाचा शेवटचा दिवस आणि नववर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करण्याची अनेक भाविकांची इच्छा असते. ही बाब विचारात घेऊन देवी मंदिर ट्रस्टने ३१ डिसेंबर रोजी रात्रभर आदिमायेचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

३१ डिसेंबरचा अपवाद वगळता रविवार (दि. २९) ते गुरुवार (दि. २) या दरम्यान मंदिर पहाटे ५ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे. दरम्यानच्या काळात घाटरस्ता आणि सेवासुविधा देखील पूर्ववत असेल, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विश्वस्त संस्थेचे पदाधिकारी व कार्यालयीन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नाताळची सुट्टी, वर्षअखेर तसेच नूतन वर्षाच्या स्वागतासाठी भाविक, पर्यटक गडावर प्रतिवर्षी गर्दी करतात. यंदाही त्यात वाढ होण्याची शक्यता असून, देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या वतीने त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

५ जानेवारीपर्यंत घाटरस्ता खुला
सप्तशृंग गडावर नववर्षाची होणारी गर्दी लक्षात घेता ५ जानेवारीपर्यंत घाटरस्ता सुरू राहणार असल्याचे मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले. रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक व झुडपे काढण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगड घाट रस्ता सोमवार, बुधवार व गुरुवार या तीन दिवशी सकाळी ६ ते ११.३० पर्यंत वाहतुकीसाठी बंद, तर मंगळवार, शुक्रवार व रविवार या तीन दिवशी संपूर्ण दिवस वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात येतो. परंतु, आता ५ जानेवारीपर्यंत सुरू असलेली कामे थांबवून घाटरस्ता पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *