नगर-पुणे महामार्ग तब्बल तीन तास ठप्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३० डिसेंबर ।। नगर-पुणे महामार्गावर केडगावजवळील रेल्वेपुलावर कंटेनर बंद पडल्यामुळे रविवारी सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. पुलापासून शहराच्या बाजूला आणि केडगावकडेही काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन ते साडेतीन तास प्रवासी या वाहतूक कोंडीत अडकले होते. दरम्यान, अवजड वाहनांनी शहरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून, शहर वाहतूक पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.


वाहतूक कोंडी व अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या अवजड वाहनांना शहरातून जाण्यास बंदी घालण्याची मागणी नागरिकांमधून सातत्याने होत असताना शहरात अवजड वाहने दिवसाढवळ्या येत आहेत. छत्रपती संभाजीनगरकडून पुण्याकडे जाणारा अवजड कंटेनर (एमएच 46 बीयू 4567) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास केडगाव येथील रेल्वेपुलावर बंद पडला. यामुळे वाहतूक कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन रुग्णवाहिकाही त्यात अडकून पडल्या होत्या. वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसदेखील वेळेवर हजर नसल्याने नागरिकांनी स्वत:हून रस्त्यावर थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. शहरातील उड्डाणपुलावरही या रांगा दिसत होत्या. पुण्याकडून येणारी वाहने बायपासमार्गे कल्याण रस्त्याने वळविली होती, मात्र त्या मार्गावरही काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे समजते.

दरम्यान, शहरातून अवजड वाहनांना बंदी असताना आणि त्यांच्यासाठी प्रचंड मोठा खर्च करून बांधलेला चारपदरी बायपास सज्ज असतानाही अनेक अवजड वाहने शहरातून जातातच कशी? हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. या वाहनांना अडविण्याची आणि बायपास टाळून शहरातून जात असल्यास शिक्षा करण्याची काही व्यवस्था नाही, का असाही प्रश्न पुढे येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *