महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३१ डिसेंबर ।। मेलबर्न कसोटी जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आता सिडनी कसोटीची तयारी सुरू केली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा हा शेवटचा कसोटी सामना असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC)च्या अंतिम सामन्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असेल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात भारताविरुद्ध आपली पूर्ण ताकद लावेल यात शंका नाही. जर ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटी जिंकली किंवा अनिर्णित ठेवली तर ते 2014-15 नंतर प्रथमच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकतील. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर ते ट्रॉफी कायम ठेवण्यात यशस्वी होतील. तसेच अशा निकालाने रोहितसेना डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीच्या अगदी जवळ जातील.
दरम्यान, सिडनी कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन कॅम्पमधून मोठी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवसापासून बरगडीच्या दुखापतीने त्रस्त आहे. मात्र, अशाही अवस्थेत त्याने प्रभावी गोलंदाजी केली आणि विराट कोहलीची विकेट घेत मोठी कामगिरी बजावली. असे असले तरी कांगारूंसाठी सिडनी कसोटीच्या पार्श्वभूमीवर स्टार्कचा फिटनेस चिंतेचा विषय बनला आहे.
खेळपट्टी पाहून प्लेइंग-11 ठरवणार?
ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी एमसीजी कसोटी जिंकल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘स्टार्कला दुखापत झाली आहे, हे खरे आहे. त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. तो वेदनेने त्रस्त आहे. बॉक्सिंग कसोटीदरम्यान त्याला सुरुवातीच्या स्पेलमध्ये त्रास झाला होता. मात्र तरीही त्याने गोलंदाजीत आपले कसब पणाला लावले. आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण त्याची आता काळजी घेणे गरजेचे आहे. सिडनी कसोटीपूर्वी तो या दुखापतीतून कसा सावरतो ते बघूया. सिडनी क्रिकेट ग्राउंडची खेळपट्टी पाहून आम्ही संघाची रचना ठरवू. जर स्टार्क पुढची कसोटी खेळू शकला नाही, तर ऱ्हाय रिचर्डसन किंवा शॉन ॲबॉट ही पोकळी भरून काढू शकतात. पण खेळपट्टी पाहून संघ व्यवस्थापन निर्णय घेईल.’
ऑस्ट्रेलियाला BGT जिंकण्याची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 4 सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. पहिली कसोटी पर्थ येथे खेळली गेली जी भारताने जिंकली. दुसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. गाबा येथे खेळलेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. तर मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून आघाडी घेतली.