अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची सूचना, पिंपरी महापालिकेचा निर्णय; शाळांना १५ दिवसांची मुदत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जानेवारी।। आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील सर्व शाळांना अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतचे पत्र शाळांना पाठविण्यात येणार आहे. उपाययोजनांसाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, मुदतीत उपाययोजना न केल्यास शाळांना नोटिसा दिल्या जाणार आहेत. नोटिसीनंतरही दुर्लक्ष केल्यास संबंधित शाळांच्या विरोधात कारवाई होणार आहे.

शहरातील रुग्णालयांपाठोपाठ शाळांमधील अग्निसुरक्षेची काय व्यवस्था आहे, याची तपासणी अग्निशमन विभागाकडून केली जाणार आहे. शाळांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. उपाययोजना केल्या असतील तर त्याची माहिती महापालिकेला द्यावी. यासंदर्भात शहरातील ६७३ शाळांना पत्र दिले जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. या मुदतीमध्ये आगीपासून सुरक्षेसाठी आवश्यक उपकरणे व अन्य बाबी बसविणे, बसविलेली उपकरणे सुस्थितीत आहे का, याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

उपाययोजना करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर शाळांना नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. त्यानंतरही शाळांकडून याबाबत दुर्लक्ष केल्यास अग्निसुरक्षा अधिनियमानुसार संबंधित शाळांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महापालिका अग्निशमन विभागाने आतापर्यंत अग्निप्रतिबंधक उपाययोजनांबाबत शहरातील विविध ३८१२ व्यावसायिक आस्थापनांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यांपैकी ४८२ आस्थापनांची अग्निशमन दलाच्या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तर, १७२ जणांना व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

शहरात आगीच्या सातत्याने होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांनी अग्निप्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत का, अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र घेतले आहे का, याची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांना पत्र पाठविली जाणार असल्याचे अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *