महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जानेवारी।। राज्यात डिसेंबरच्या शेवटी ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झाला होता पण पुन्हा थंडी वाढू लागली असली तरी, कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे बहुतांश भागांमध्ये पहाटे धुकं, दुपारच्या वेळी ऊन, आणि सायंकाळच्या वेळी तापमानातील घट पाहता थंडी जाणवत आहे. या हवामान बदलामुळे राज्यात सध्या आजारपणाचं सावटही पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील तापमानाच चढ-उतार अपेक्षित असून, मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येणार आहे. उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांध्ये तापमानाच वाढ झाल्यानं इथं थंडीचा कडाका कमी झाला आहे. ज्यामुळं इथून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं महाराष्ट्रातील तापमानवाढ पाहायला मिळाली.
हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांच तापमान अचानक कमी होऊन त्यात क्वचित वाढ होण्याच्या शक्यता आहे. मात्र तरीही कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा मात्र राज्यात कायम असेल येत्या काही दिवसांत किमान तापमानाचा पारा 15 अंशांहून खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार आहे.
कोकण किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यानं उष्मा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्रामध्ये अल्हाददायक गारठा पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातील थंडीवर या प्रणालीचा फारसा परिणाम होणार नसून, इथं तापमान स्थिर राहील. तर, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मात्र किमान तापमानात वाढ नोंदवली जाईल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.
बुधवारी राज्यात असे होते तापमान
पुणे 31.4 (14.9), अहिल्यानगर 30.8(14.7), धुळे 30.5 (12.5), जळगाव 30.5(13.0), जेऊर 32.5 (15.5), कोल्हापूर 30.8 (18.1), महाबळेश्वर 25.9 (14.5), मालेगाव 28.0 (17.4), नाशिक 30.9 15.5), निफाड 28.7 (13.2), सांगली 32.1 (17.6), सातारा 31.9 (16.1), सोलापूर 33.2 (18.9), सांताक्रूझ 34.2 (20.5), डहाणू 28.2 (19.8), रत्नागिरी 35.23 (20.4), छत्रपती संभाजीनगर 30.2 (16.0)