महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जानेवारी।। मागील पाच वर्षापासून बंद असलेले पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान दि. २६ जानेवारीपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गुरुवारी (दि.२) झालेल्या बैठकीत निर्णय घेतला. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. (Paithan Sant Dnyaneshwar Udyan)
राज्यभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले संत ज्ञानेश्वर उद्यान मागील पाच वर्षापासून बंद होते. दुरवस्था झाल्याने पर्यटकांनीही उद्यानाकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे १९० एकर क्षेत्रात पसरलेल्या उद्यानाचे पुनर्जीवन करण्यासाठी खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास बापू भुमरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष निधीची तरतूद करून घेतली होती. परंतु, उद्यानामध्ये हाती घेण्यात आलेल्या विविध संगीत कारंजासह इतर कामे समाधानकारक न झाल्याने उद्यान सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तारीख पे तारीख देण्याचे काम सुरू होते.
उद्यानात सुरू असलेले काम गुणवत्तेनुसार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या होत्या. त्यानंतर उद्यान खुले करण्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी संपूर्ण काम पूर्ण करून दि. २६ जानेवारीरोजी उद्यान सुरू करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधित पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत.
या बैठकीत मुख्य अभियंता गवळी, अधीक्षक अभियंता समाधान सब्बनीवार, उद्यान अभियंता दिलीप डोंगरे, उप अभियंता तुषार विसपुते, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण, प्रा. संतोष गव्हाणे, माजी नगरसेवक बजरंग लिंबोरे, रमेश शेळके, बाळू आहेर, नामदेव खरात आदीसह संबंधित विभागाचे ठेकेदार व अधिकारी, कर्मचारी, उद्यान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.