महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.३ जानेवारी।। शहराच्या वातावरणात पुन्हा बदल होत असून, थंडीला सुरुवात होत आहे. गुरुवारी शहराच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट झाली. त्यामुळे आगामी दोन दिवसांत थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज आहे.
गेले पंधरा दिवस शहरात थंडी कमी होती, कारण ढगाळ वातावरण होते. त्यामुळे किमान तापमान 15 ते 23 अंशांवर गेले होते. उत्तर रात्री ते पहाटेच्या वेळेस शहरात गारठा जाणवत होता. मात्र गुरुवारी 2 जानेवारीपासून वातावरणात पुन्हा बदल झाला. उत्तर भारतातून येणार्या शीतलहरी सक्रिय झाल्याने शहरात आगामी 24 तासांत गारठा वाढेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे.
किमान तापमानात सतत चढ-उतार..शहराच्या तापमानात गेल्या महिनाभरापासून सतत चढ-उतार होत आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये थंडी पडेल असे वाटत होते. मात्र, नोव्हेंबर महिना उष्णतेचा ठरला. त्या पाठोपाठ डिसेंबरमध्येही फारशी थंडी पडली नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तर संपूर्ण आठवडा शहरात थंडीच नव्हती.
आता जानेवारीत थंडी पडेल असे वाटत असतानाच पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे शहराच्या किमान तापमानात सतत चढ-उतार होत आहे. जानेवारीत जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या महासंचालकांनी दिला आहे. त्यामुळे शहरात जानेवारीत थंडी पडेल.