महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील शेवटचा कसोटी सामना सिडनीमध्ये सुरु आहे. भारतीय संघात रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची धुरा सोपावण्यात आली. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार बुमराहला मैदानातून बाहेर जावे लागले. त्याच्या पाठीत दुखू लागले होते. तेव्हा पाठीच्या दुखण्यामुळे बुमराहला रुग्णालयात वैद्यकीय तपासासाठी नेण्यात आले होते. सामना सुरु असतानाच तो ड्रेसिंग रुममध्ये परतला. नुकतंच बुमराहच्या दुखापतीबाबतची अपडेट समोर आली आहे.
कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या शेवटी बुमराहने ख्वाजाला, तर दुसऱ्या दिवशी लबूशेनला बाद केले. त्याने दुसऱ्या दिवशी १० षटके देखील टाकली. खेळ सुरु असताना त्याला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या दुखण्याबाबतची अपडेट समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, ‘तिसऱ्या दिवशी बुमराह फलंदाजी करु शकेल. पण उद्या त्याला कसे वाटते यावरुन त्याच्या गोलंदाजीसंबंधित निर्णय घेतला जाईल.’
🚨 BUMRAH LEAVES FOR SCANS. 🚨
– Fingers are crossed…!!! 🤞pic.twitter.com/HAdB2tudiX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील एकूण ९ डावांमध्ये जसप्रीत बुमराहने १३.०६ च्या सरासरीने तब्बल ३२ गडी बाद केले आहेत. या कसोटी सामन्यामध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्याने कर्णधारपद सांभाळले होते. बुमराहमुळे भारताला त्या सामन्यात विजय मिळाला. आता शेवटच्या सामन्यातही त्याच्याकडे कर्णधारपद आहे. बुमराहकडून संघाला आणि चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. दुखापतीमुळे बुमराहच्या खेळावर परिणाम होऊ नये यासाठी भारतीय चाहते प्रार्थना करत आहेत. बुमराह भारतीय संघासाठी फार महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.
सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाच्या संघ १८१ धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत भारताचे ६ गडी बाद केले. दुसऱ्या डावात रिषभ पंतने सर्वाधिक ६१ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाच्या शेवटी भारत १४५ धावांनी आघाडीवर आहे.