महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक रोडचे काम सुरु आहे. येत्या २ ते ३ महिन्यांमध्ये हा लिंक रोड प्रवासासाठी खुला केला जाईल असे म्हटले जात आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासातील अर्धा तास वाचणार आहे. हा प्रकल्प पुणेकरांसाठी खास आहे, कारण मिसिंग लिंकमुळे त्यांना लवकरच सुरु होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाला पोहोचण्यास कमी वेळ लागणार आहे.
एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता राकेश सोनावणे यांनी लिंक रोड प्रकल्पाच्या बांधकामासंबंधित माहिती दिली. ते म्हणाले, मिसिंग लिंक रोडचे ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी काम वेगाने केले जात आहे. दोन बोगदे आणि दोन पूल असलेला या प्रकल्पाचे काम कठीण आहे. तेव्हा घाई करुन कोणतीही जोखीम पत्करता येणार नाही. प्रकल्पासाठी आवश्यक तितका वेळ देऊन काम पूर्ण करु.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होऊन प्रवासासाठी खुले होणार आहे. त्यामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा लाभ घेण्यासाठी सोईस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. तेव्हा मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोड खुला झाल्याने पुणेकरांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी कमी वेळ लागेल. हा रस्ता एप्रिल ते जून या कालावधीत खुला होईल असे म्हटले जात आहे.
आता पुणे ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास १६० किमीचा असून त्यात किमान चार तास जातात. तर पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १२० किमी अंतरावर आहे आणि त्यासाठी अडीच तास लागतात. मिसिंग लिंक रोड सुरु झाल्याने पुणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रवास दोन तासात करणे शक्य होणार आहे.
मिसिंग लिंक रोड खोपोली ते कुसगावमधील सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतच्या १९.८ किमी अंतराचा भाग बायपास करणार आहे. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अंतर ६.५ किमीने कमी होणार आहे. हा लिंक रोड १३.३ किमी लांब आहे. त्यात ८४० मीटर आणि ६५० मीटर लांबीचे दोन केबल ब्रीज असणार आहेत. शिवाय १.७ किमी लांब बोगद्याचा या लिंक रोडमध्ये समावेश असणार आहे. प्रकल्पासाठी ६,५९६ कोटी रुपयांचा निधी खर्च अपेक्षित आहे. २०१९ मध्ये प्रकल्पाला सुरुवात झाली होती. २०२२ पर्यंत लिंक रोड पूर्ण होणे अपेक्षित होते पण कोविडमुळे या रस्त्याच्या कामाला विलंब झाला अशी माहिती राकेश सोनावणे यांनी दिली आहे.