महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। Rain Alert : देशभरातील वातावरणामध्ये बदल होत असताना उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ५ आणि ६ जानेवारी या दोन दिवसांमध्ये उत्तर भारतात अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत होते. तर डोंगराळ भागांमध्ये ७ जानेवारीपर्यंत बर्फवृष्टीसह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ४-५ जानेवारीला हिमवर्षावासह पर्जन्यवृष्टी होणार असल्याने अलर्ट जारी करण्यात आला होता. देशातील उत्तर पश्चिम आणि मध्य भागात दोन ते तीन दिवस धुके पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील २४ तासांत बिहारमध्ये कोल्ड डेची स्थिती आहे. तर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, चंडीगढ आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागांमध्ये धुके पडले होते.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात होणाऱ्या हवामानातील बदलांमुळे पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये ५ ते ६ जानेवारी या दोन दिवसांमध्ये कडाक्याचा पाऊस पडणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ४-५ जानेवारीला (म्हणजेच आज आणि उद्या) बर्फवृष्टी आणि पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली गेली होती.
उत्तर पश्चिम भारतात ठिकठिकाणी तापमानात किमान दोन ते तीन डिग्री सेल्सियसने वाढ होणार आहे. पण त्यानंतर लगेच तापमान चार डिग्रीने कमी होईल. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात तापमानात फारसा बदल होणार नाही. तेलंगना आणि कर्नाटकच्या उत्तर भागांमध्ये हवामान थंड राहील. तर उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्वेकडील भागांमध्ये आजपासून कोल्ड डे जाहीर करण्यात आला होता.
भारतातील उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पश्चिमी विक्षोभ या स्थितीमुळे वातावरणात बदल घडला आहे. पश्चिमेकडून भारताकडे येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे वातावरणात बदल घडतो, या स्थितीला पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance) असे म्हटले जाते. यामुळेच जानेवारीच्या सुरुवातीला देशभरात काही ठिकाणी पर्जन्यवृष्टी, काही ठिकाणी हिमवर्षाव, तर काही ठिकाणी धुके पडले आहे.