महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.४ जानेवारी।। पाकिस्तान संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यातील पहिल्याच डावात आफ्रिकन फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली. यामध्ये पहिल्यांदाच सलामीसाठी उतरलेल्या रायन रिकेल्टनने द्वीशतकी खेळी केली, त्याचबरोबर कर्णधार टेम्बा बावूमा व कायल वेरेन यांनी शतकी खेळी केली. यांच्या खेळीमुळे दुसऱ्या दिवसापर्यंत आफ्रिकेने ७ विकेट्स गामावत धावांचा डोंगर उभा केला आहे. आफ्रिकेने ५५० धावांचा टप्पा पार केला आहे.
आत्तापर्यंत ९ कसोटी सामने खेळणारा रायन रिकेल्टन १० व्या कसोटीत सलामी फलंदाजीसाठी आला. आफ्रिकेने सुरूवातीचे ३ विकेट्स स्वस्तात गमावल्या. एडन मार्करामच्या रूपाने ६१ धावांवर आफ्रिकेने आपला पहिली पहिली विकेट गमावली. मार्कराम १७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विआन मुल्डर ५ व ट्रिस्टन स्टब्स शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार टेम्बा बावूमा व रायन रिकेल्टनने मोठी भागीदारी उभारली.
दोघांनी चौथ्या विकेटसाठी २३५ धावांची द्वीशतकी भागीदारी केली. ज्यामध्ये कर्णधार बावूमाने शतक झळकावले व रायन रिकेल्टानने दीडशतकी खेळी केली. ७७ व्या षटकात बावूमा बाद झाला आणि त्यांची भागीदारी तुटली. बावूमाने २ षटकार व ९ चौकारांच्या सहाय्याने १७९ चेंडूत १०६ धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर डेव्हिड बेडिंगहॅम ५ धावांवर बाद झाला.
रिकेल्टनने सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कायल वेरेनला साथीला घेत पुन्हा मोठी भागीदारी उभारली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १४८ धावांची शतकी भागीदारी केली. शतक पूर्ण होताच वेरेन माघारी परतला. त्याने या खेळीमध्ये ९ चौकार व ५ षटकार ठोकले. मीर हामझाच्या गोलंदाजीवर रायन २९ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने २५९ धावांवर बाद झाला.
रायन रिकेल्टन विक्रम
सलामीवीर म्हणून खेळताना द्विशतक झळकावणारा रायन हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा आणि चौथा खेळाडू ठरला आहे. १९८७ मध्ये श्रीलंकेसाठी ब्रेंडन कुरुप्पूने प्रथमच अशी कामगिरी केली होती. ग्रॅमी स्टिम व डेव्हॉन कॉन्वे यांनीही अशी विक्रमी खेळी केली आहे. त्याचबरोबर २०१६ नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्यात यश मिळवले आहे.
सलामीवीर म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारे खेळाडू
रायन रिकेल्टन (दक्षिण आफ्रिका) – वि पाकिस्तान (केप टाऊन, २०२५)
ब्रेंडन कुरुप्पू (श्रीलंका) – विरुद्ध न्यूझीलंड (कोलंबो, १९८७)
ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) – विरुद्ध बांगलादेश (लंडन, २००२)
डेव्हॉन कॉन्वे (न्यूझीलंड) – विरुद्ध इंग्लंड (लंडन, २०२१)