महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जानेवारी।। भारतीय क्रिकेट संघासाठी रविवारचा दिवस फारसा खास राहिला नाही. भारताला रविवारी (५ जानेवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याच सिडनीमध्ये तिसऱ्याच दिवशी ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवामुळे भारतीय संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील आव्हानही संपले, तसेच भारताला मालिकाही ३-१ अशा फरकाने गमवावी लागली. सिडनी कसोटीत भारताला दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचीही कमी भासली.
सिडनी कसोटी सामन्यातून रोहित शर्माने माघार घेतल्यानंतर जसप्रीत बुमराहने नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र, त्याला दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरू असतानाच पाठीच्या दुखापतीचा फटका बसला.
तो १० षटकांच्या गोलंदाजीनंतर मैदानातून बाहेरही गेला. तसेच त्याला लगचेच स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्याने नंतर गोलंदाजी केली नाही.
बुमराहने भारताकडून दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी १० व्या क्रमांकावर उतरला होता. पण तो शून्यावरच बाद झाला. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे लक्ष्य दिल्यानंतरही बुमराह गोलंदाजीला उतरला नव्हता.
त्याच्याशिवायच भारतीय संघाने दुसऱ्या डावात गोलंदाजी केली. त्यामुळे बुमराहची दुखापत किती गंभीर आहे आणि तो किती काळ संघातून बाहेर राहिल, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत सिडनी कसोटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने प्रतिक्रिया दिली.
गंभीर म्हणाला, ‘त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे आत्ता सांगू शकत नाही. सध्या फिजिओ आणि मेडिकल टीम त्याच्यावर उपचार करत असून योग्य वेळी योग्य अपडेट आम्ही देऊ.’
याशिवाय गंभीरने बुमराहच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. त्याने म्हटले की बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने प्रत्येकवेळी गोलंदाजी करताना विकेट्स घेतल्या. त्याला दुसऱ्याबाजूने मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि आकाश दीप यांनीही चांगली साथ दिली.
सामना झाल्यानंतर बुमराह देखील म्हणाला की ‘निराशाजनक होते, पण तुम्हाला तुमच्या शरीराचेही ऐकावेच लागते. तुम्ही तुमच्या शरीराविरुद्ध लढू शकत नाही. त्यामुळे एका चांगल्या खेळपट्टीवर गोलंदाजी न करण्याचे वाईट वाटले. पण तुम्हाला हे स्वीकारावे लागते आणि पुढे जावे लागते.’
बुमराह या मालिकेतील मालिकावीर ठरला. त्याने या मालिकेत १५१.२ षटके गोलंदाजी करताना ३२ विकेट्स घेतल्या. एका बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला.