महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जानेवारी।। भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची बाॅर्डर- गावस्कर ट्राॅफी आज अखेर संपली. पाचवा आणि शेवटचा सामना हा सिडनी येथे रंगला तर या निर्णायक सामना जिंकण्यात ऑस्ट्रेलियाने यश मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-१ ने जिंकून WTC फायनलसाठी पात्र ठरले. ११ जूनपासून लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर WTC फायनलमध्ये तिचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.
ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकताच टीम इंडियाची बीजीटीमधील विजयी मालिका संपुष्टात आली. भारताने ही ट्रॉफी सलग चार वेळा जिंकली होती पण यावेळी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून मोठी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने २०१४-१५ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. यानंतर टीम इंडियाने सलग ४ वेळा हे विजेतेपद पटकावले पण यावेळी त्याचे ट्रॉफी राखण्याचे स्वप्न भंगले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा मालिका जिंकली. त्याचबरोबर टीम इंडियाने ही मालिका १० वेळा जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनंतर इतिहास रचला
भारताने पर्थ कसोटी २९५ धावांनी जिंकली यानंतर ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. गाबा येथे खेळवण्यात आलेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. शेवटचे दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटी १८४ धावांनी जिंकली तर सिडनी कसोटीत टीम इंडियाचा ६ विकेट्सनी पराभव झाला. सिडनी येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या आणि ५व्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात १८५ धावा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला १८४ धावांत गुंडाळले होते आणि ४ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या १५७ धावांत गडगडली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १६२ धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्याने ४ विकेट गमावून सहज गाठले. ट्रॅव्हिस हेड ३४ धावांवर नाबाद परतला आणि नवोदित ब्यू वेबस्टरने ३९ धावा केल्या.