महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जानेवारी।। तूर काढणीला आता सुरवात झाली आहे. यामुळे बाजारात नवीन तूर येऊ लागली आहे. मात्र शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीदरात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. महिन्याभरापूर्वी दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर असलेल्या तुरीच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण होऊन सात हजार रुपयांवर दर आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आता काढणी केलेली तूर मिळेल त्या दरात विक्री करावी लागणार आहे.
यंदा कापूस व सोयाबीनला भाव कमी मिळाल्याने किमान तुरीला तरी समाधानकारक भाव मिळेल; अशी शेतकऱ्यांना अशा होती. गेल्या दोन ते तीन वर्षापासून तुरीला प्रतिक्विंटल दहा हजार रुपयांच्या जवळपास भाव मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली होती. मात्र तूर उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा एकदा अडचण होत आहे. तूर काढायला सुरुवात झाल्यानंतर आता मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली जात आहे. मात्र दरात मोठी घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
तीन हजार रुपयांची घसरण
यंदा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यापूर्वीच तुरीचे दर घसरले असून महिन्याभरात तब्बल क्विंटल मागे तीन हजार रुपयाची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणी आला आहे. महिन्याभरापूर्वी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला दहा हजार रुपये क्विंटलच्या आसपास भाव होता. किमान तेच भाव कायम राहतील; अशी शेतकऱ्यांना आशा होती. कपाशी, सोयाबीनमध्ये झालेल्या नुकसान तूर भरून काढेल; अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना तुरीने सुद्धा ही अपेक्षा अभंग केली आहे.
ढगाळ वातावरणाने गहू पिकावर रोगराई
काही दिवसापासून जिल्ह्यातील वातावरण बदलत आहे. कधी थंडी, कधी धुके तर कधी ढगाळ अश्या वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत. गहू पिकावर रोगराई पसरली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. तर दुसरीकडे शेतकरी स्प्रिंकलच्या साहाय्याने गहू पिकाला पाणी देत पिक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.