आता रेल्वे स्थानकांवरही करता येणार कार्यालयाचे काम; देशातील पहिले डिजिटल लाउंज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। रेल्वे प्रवाशांची बदलती जीवनशैली आणि डिजिटल वर्कच्या गरजेचा विचार करून पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी एक अत्याधुनिक डिजिटल लाउंज साकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, बोरिवली, सुरत, बडोदा यासारख्या प्रमुख स्थानकांवर हे डिजिटल लाउंज उभारण्यात येईल. देशातील पहिले डिजिटल लाउंज मुंबईमध्ये स्थापन होणार. या लाउंजमध्ये प्रवाशांना चहा-कॉफीच्या आस्वादासोबतच एकांतात कार्यालयाचे काम करण्याची सुविधा मिळणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

डिजिटल लाउंजमध्ये ई-वर्कसाठी आधुनिक सोयीसुविधा असणार आहेत. येथे ४० जणांची आसन व्यवस्था असेल. लॅपटॉप चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंट, हाय-स्पीड वाय-फाय, काम करण्यासाठी विशेष टेबल तसेच रिफ्रेशमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कामाच्या ताणातून थोडीशी मोकळीक मिळावी आणि एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या पकडण्यासाठी अनेक प्रवासी स्थानकांवर वेळेआधी येतात. यामध्ये बऱ्याच वेळा कार्यालयाचे काम करणारे प्रवाशीही असतात. गर्दीत आणि गोंधळात काम करताना त्यांना त्रास होतो. चार्जिंग पॉइंट शोधणे, वाय-फायसाठी संघर्ष करणे किंवा चहा-कॉफीसाठी बॅग सोडून जावे लागणे अशा समस्या त्यांना भेडसावतात. या सर्व अडचणींवर तोडगा म्हणून रेल्वेने डिजिटल लाउंज ही आधुनिक सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

चार स्थानकांवर सुविधा
सध्या हा प्रकल्प पायलट प्रकल्प म्हणून सुरू केला जाणार असून, मुंबई सेंट्रल, बोरिवली, सुरत आणि बडोदा या स्थानकांवर प्राथमिक स्तरावर त्याची अंमलबजावणी केली जाईल. या प्रकल्पाच्या यशानंतर इतर प्रमुख स्थानकांवरही तो सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या डिजिटल कामाच्या गरजांचा विचार करून पश्चिम रेल्वेकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या डिजिटल लाउंजचा दर्जा विमानतळांवर मिळणाऱ्या सुविधांपेक्षाही चांगला असेल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रेल्वे बोर्डाला पाठविणार प्रस्ताव
ही संकल्पना फक्त पश्चिम रेल्वेपुरती मर्यादित नाही तर संपूर्ण भारतीय रेल्वेत प्रथमच राबविली जात आहे. प्रवाशांच्या बदलत्या गरजा आणि कामकाजाची आधुनिक पद्धत लक्षात घेऊन हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने या प्रकल्पाशी संबंधित प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याची तयारी केली आहे. पायलट प्रकल्प म्हणून याची अंमलबजावणी झाल्यानंतर संपूर्ण देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा उपक्रम राबविण्याचा विचार आहे.

लाउंजची वैशिष्ट्ये

४० जणांची आसन व्यवस्था

हाय स्पीड वाय-फाय नेटवर्क

लॅपटॉप चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या पॉइंट्सची सोय

बसण्यासाठी आधुनिक व्यवस्था

कामासाठी विशेष

डिझाइन केलेले टेबल

रिफ्रेशमेंटची सुविधा

(चहा-कॉफी)

शांत वातावरण

रेल्वेचे इंडिकेटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *