महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। काटेवाडी : विधानसभा निवडणुकीनंतर परदेशात सुट्टीसाठी गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (ता. ४) सायंकाळी बारामतीत दाखल झाले. रविवारी (ता. ५) एका कार्यक्रमात भाषण करताना अनेक कार्यकर्ते मध्येच निवेदन देत असल्याने ते वैतागले. तुम्ही मते दिली याचा अर्थ तुम्ही माझे मालक नाही झाला, सालगडी करता काय मला…’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा बारामतीसह राज्यभरात सुरू आहे.
बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोलपंपाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. संघाचे अध्यक्ष विक्रम भोसले, उपाध्यक्षा सोनाली जायपत्रे, व्यवस्थापक नीलेश लोणकर यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. पवार भाषण करत असताना विविध विषयांबाबत बोलत होते.
याचवेळी उपस्थितांमधून शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाबाबत त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न झाला. निवेदन स्वीकारत असतानाच अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान, आयुर्वेद महाविद्यालयाबाबत सार्वजनिक आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांना विनंती करू, असे ते म्हणाले.शिवसृष्टी लवकरच पूर्णत्वास अजित पवार यांनी बारामतीतील विकासकामांची पाहणी केली.
यावेळी वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी भव्य शिवसृष्टी येत्या काही वर्षांत बारामतीत पूर्णत्वास जाईल. या साठी विविध टप्प्यांमध्ये जवळपास ६५० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीवरील जिराईत हा शिक्का पुसून टाकण्याच्या दृष्टीने नीरा कऱ्हा उपसा जलसिंचन योजनेची निविदा काढण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.